सांगली : ‘आरसीएच’ कर्मचार्यांच्या मानधनवाढीच्या ठरावाबाबत सोमवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मानधनवाढीचा फैसला होणार आहे. दरम्यान, मानधनवाढीच्या ठरावाला काँग्रेसचा विरोध कायम आहे.
एप्रिल महिन्यातील महासभेत आशासेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. याच विषयात उपसूचनेद्वारे आरसीएचकडील डॉक्टर, कर्मचार्यांच्या मानधन वाढीचा ठराव करण्यात आला. मे महिन्यातील महासभेचा आधार घेऊन तो ठराव कायम झाला. आरसीएचच्या कर्मचार्यांना दरवर्षी ८ टक्के मानधनवाढ होत असताना अतिरिक्त वाढ कशासाठी, असा प्रश्न करीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी ठरावाला विरोध केला.
दरम्यान, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत भोसले, अमर निंबाळकर, संजय कांबळे यांनी गुरूवारी सायंकाळी आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेतली. सर्वच मानधनी कर्मचार्यांच्या मानधनवाढीचा विचार न करता ‘आरसीएच’ कर्मचार्यांच्या मानधनवाढीचा ठराव करणे, यापूर्वीच्या ठरावाशी विसंगत आहे. राष्ट्रवादीने विषयपत्रिकेवर विषय घेऊन त्यावर चर्चा घडवून ठराव करणे आवश्यक होते. पण त्याला फाटा देऊन मधला मार्ग अवलंबणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले. त्यावर आयुक्तांनी सोमवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.