मिरज शासकीय रुग्णालयात कवठेमहांकाळ येथील रुग्णाचे मंगळवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले. ते उपचारासाठी दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचारी अनिकेत नलवडे याने रुग्णाच्या देखभालीसाठी पाचशे रुपये मागितले. नातेवाइकांनी नलवडे यास ‘गुगलपे’द्वारे पाचशे रुपये पाठविले. शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा हा पुरावा रुग्णालय प्रशासनाला दिल्यानंतर अनिकेत नलवडे याची हकालपट्टी करण्यात आली. सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात सफाईचा ठेका असलेल्या सूर्या एजन्सीकडे हा अनिकेत नलवडे काम करीत होता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने याबाबत ठेकेदारासही कारवाईची नोटीस बजावली आहे.
कोरोना रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना सूर्या एजन्सीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून पैसे मागणी करण्यात येत असल्याने या कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. कोविड साथीदरम्यान गाेरगरीब रुग्णांचा आधार ठरलेल्या शासकीय रुग्णालयाच्या योगदानाचे कौतुक होत असताना ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकारामुळे रुग्णांचे नातेवाईक त्रस्त आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावरही कारवाईची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे, मनीषा पाटील, सरोजिनी माळी, हेमा नलवडे, सुगंधा माने, शकिरा जमादार, रुक्मिणी आंबिगेर यांनी केली आहे.