अशोक पाटीलइस्लामपूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात मनीपॉवरच्या राजकारणाची चर्चा आहे. हातकणंगले लोकसभा निवडणुकीतही मनीपॉवरचा वापर झाला होता. आगामी विधानसभेला जयंत पाटील यांच्याविरोधात मनीपॉवरची ताकद वापरण्याचा डाव विरोधाकांकडून आखला जात आहे. त्यामुळेच पाटील यांच्या स्टार प्रचारक समर्थकांपुढे मोठे आव्हान राहणार आहे.गेल्या सात विधानसभा निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांच्या मताधिक्याच्या आकडेवारीचा आलेख पाहता विरोधी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. सध्या भाजप आणि शिंदेसेनेमधील दिग्गज नेते एकवटले आहेत. लोकसभेप्रमाणेच मनीपॉवरचा फंडा आगामी विधानसभेला वापरण्याचा डाव जयंत पाटील यांच्या विरोधकांकडून सुरू आहे. त्यामुळे जयंत पाटील समर्थकांना आत्तापासूनच सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.
प्रतीक पाटील यांच्यापुढे विरोधकांचे आव्हान..दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभेसाठी जयंत पाटील समर्थकांत सध्यातरी हालचाली नाहीत. परंतु, स्वत: जयंत पाटील बुथ कमिट्या सक्षम करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या अपरोक्ष मतदारसंघाची जबाबदारी चिरंजीव प्रतीक पाटील सांभाळत आहेत. राजारामबापू पाटील उद्योग समुहात युवकांना संधी देण्याचे प्रयत्न झाले. सध्या पाटील यांनी शरद पवार यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी राज्यात संपर्क वाढवला आहे. त्यामुळेच इस्लामपूर मतदारसंघात प्रतीक पाटील तळ ठोकून आहेत. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी जयंत पाटील यांना मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी महायुतीतून उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे.
राज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढत आहे. इस्लामपूर मतदारसंघातील आमचे नेते आमदार जयंत पाटील यांची ताकद अबाधित आहे. विधानसभेला त्यांच्या अपरोक्ष त्यांचे समर्थक एकदिलाने प्रचार यंत्रणा राबवतील. जिल्ह्यातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. - देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष