सांगली : मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने सांगलीला झोडपले. शहराच्या गावठाणासहीत विस्तारीत भाग तसेच गुंठेवारीत दलदल निर्माण झाली होती. अनेकठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वहात होते. विद्युत यंत्रणेमध्येही ठिकठिकाणी बिघाड झाल्याने काहीठिकाणी रात्रभर वीजपुरवठा खंडित राहिला, तर काहीठिकाणी तासभर बंद राहिला.सांगलीच्या शंभर फुटी रस्त्यावरील उपनगरांमध्ये पावसाने दलदल निर्माण झाली आहे. अनेकठिकाणी पावसाचे तसेच सांडपाणी साचून राहिल्याने नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालय परिसर, स्टँड रोड, स्टेशन रोड, मारुती चौक, शिवाजी मंडई परिसर, जुना बुधगाव रस्ता, कॉलेज कॉर्नर, राजवाडा परिसर याठिकाणी बुधवारी सकाळपर्यंत पाणी साचून राहिले होते. स्टेशन रोडवर गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जुना बुधगाव रस्त्यावर इदगाह मैदानापासून काही अंतरावर गुडघाभर पाणी साचून हा रस्ता वाहतुकीसाठी जवळपास बंद झाला होता.पावसाने सर्वाधिक हाल गुंठेवारी भागात झाले. शामरावनगरचा संपूर्ण परिसर, हनुमाननगर, लक्ष्मी-नारायण कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनी, सिव्हिल रोड, पत्रकार नगर आदी भागात दलदल निर्माण झाली होती. या परिसरातील ड्रेनेजचे अर्धवट राहिलेले कामही दलदलीस कारणीभूत ठरले.
मोकळ््या प्लॉटची संख्या मोठी असल्याने याठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहिले आहे. मुुरमीकरण झालेल्या रस्त्यांवरूनही ये-जा करणे मुश्किल झाले होते. गटारींमधील सांडपाणीही अनेकठिकाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे एका पावसाने गुंठेवारी नागरिकांना मोठा दणका बसला.शहराच्या मारुती चौक, मारुती रोड, शिवाजी मंडई परिसरात बुधवारी सकाळी चिखलमय झालेले रस्ते अग्निशमन विभागाच्या वाहनांनी धुतले. याठिकाणीही पाणी साचून राहिले होते. सिव्हिल हॉस्पिटल ते राम मंदिर चौक हा रस्ता खराब झाला आहे. अनेकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्यामुळे मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने याठिकाणी पाणी साचून राहिले होते.वीजपुरवठा खंडितविजांचा कडकडाट व वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावल्यामुळे शहराच्या बहुतांश भागातील वीजपुरवठा मंगळवारी रात्री बारा वाजता बंद झाला. वसंतदादा कारखाना परिसर, लक्ष्मीनगर, शांतिनिकेतन याठिकाणी रात्रभर वीजपुरवठा खंडित राहिला. वसंतदादा औद्योगिक वसाहत, संजयनगर, अहिल्यानगर येथेही काही काळ वीजपुरवठा खंडित राहिला. गावठाणात केवळ तासभर वीजपुरवठा बंद होता. वीजेअभावी लोकांचे हाल झाले.सांगलीसाठी धोक्याची घंटासांगलीच्या जुना बुधगाव रस्त्यावरील पाच ते सहा ओत अतिक्रमणांनी भरले आहेत. गॅरेज व अन्य व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर येथे अतिक्रमणे करून बांधकामे केली. ओतांमध्ये भर टाकले. त्यामुळे एका मुसळधार पावसाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. बुधवारी सायंकाळपर्यंत याठिकाणी पाणी साचून राहिले.
येत्या काही दिवसांत परिस्थिती अशीच राहिली तर पूरस्थितीत याचा फटका उपनगरांसह गावठाणालाही मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. हा संपूर्ण परिसर पूरपट्ट्यात येत असतानाही याठिकाणी उघडपणे प्रशासनाला आव्हान देत अतिक्रमणे व पक्क्या इमारती उभारल्या जात आहेत. शहरासाठी ही धोक्याची घंटा आहे.