गंगाराम पाटील ल्ल वारणावती शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसरात १५ दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व वळीव पाऊस झाला. त्यामुळे भात पिकाची चांगली उगवण झाली आहे. पण अद्याप मान्सूनला सुरुवात झालेली नाही. फक्त ढगाळ वातावरण आहे. गतवर्षी याच तारखेला १७० मिलिमीटर पावसासह एकूण ४४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चांदोली धरण परिसर हा पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. येथील वार्षिक पर्जन्यमान सरासरी चार ते साडेचार हजार मिलिमीटर असते, परंतु चालूवर्षी एक जूनपासून आजअखेर फक्त १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणातील पाणीसाठा १९.३६ टीएमसी होता. सध्या धरणात केवळ ६.९० टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस न पडल्यास या भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून परिसरात दिवसभर फक्त ढगाळ वातावरण आहे. जूनअखेर या परिसरातील शिराळा तालुक्यातील खुंदलापूर-धनगरवाडा, मणदूर, सोनवडे, खोतवाडी, मिरुखेवाडी, गुढे-पाचगणी, आरळा, तर शाहूवाडी तालुक्यातील उखळू, शित्तूर-वारुण, खेडे, डिगेशिराळे, सोंडोली, कांडवन, विरळे, पळसवडे, मालगाव यासह डोंगरदऱ्यातील व डोंगरपठारावरील शेतामध्ये काही ठिकाणी धूळवाफेवर भात पेरण्या केल्या जातात, तर उर्वरित शेतीमध्ये जवळपास साठ टक्के शेतीत चिखलगुठ्ठा पध्दतीने भाताची रोपलागण केली जाते. पण अद्याप पाऊसच सुरु झाला नसल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. चांदोली धरण पहायला येणाऱ्या पर्यटकांना रोपलागणीच्या कामाचे आकर्षण वाटत असते, तर पाऊसच न पडल्याने डोंगरदऱ्यातील कोसळणारे लहान-मोठे धबधबे पाहावयास मिळत नाहीत, तर चांदोली धरणाचा परिसरही न्याहाळता येत नाही. हिरवागर्द वनराईने नटलेला परिसर, घनदाट झाडी, डोंगरदऱ्या व डोलणारी भात पिके तसेच चांदोली धरण पाहताना पर्यटकांच्या डोळ््यांचे पारणे फिटते, पण पाऊसच पडला नसल्याने पर्यटकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. ढगाळ वातावरण : रात्री पावसाची हजेरी यंदा ऐन पावसाळ््याच्या वेळेत वारणा नदी कोरडी पडलेली दिसत आहे. अशी स्थिती गेल्या १५ वर्षात कधीही पहायला मिळाली नसल्याचे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री साडेनऊ वाजता पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
मान्सूनची दडी...
By admin | Published: June 26, 2016 12:57 AM