सांगली : शहरातील टिंबर एरिया परिसरातील सि. स. क्र. २६८/१ या जागेवर महापुरुषांचे संयुक्त स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा विषय येत्या महासभेत चर्चेला येणार आहे. एकूण साडेतीन कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. सांगलीच्या या आरक्षित जागेवर क्रांती स्तंभाची ४२ फुटी प्रतिकृती व पाच महापुरुषांचे अर्धपुतळे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. बाल, अबाल-वृद्धांसाठी याठिकाणी लॉन, वॉकिंग ट्रॅक, वॉटर एटीएम, रंगीत कारंजे, एलईडी दिव्यांची आकर्षक रचना अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. एक प्रेरणास्थळ म्हणून या स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. यासाठीची तांत्रिक मंजुरी शासनाकडून घेण्यात आली आहे. खासदार रामदास आठवले यांनी तातडीने या स्मारकासाठी १२ लाख रुपये महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे उर्वरित निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा विषय महासभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आला आहे. महासभेत यास मंजुरी घेऊन निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. वारसा जतन निधीतून या स्मारकास निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. या निधीतून स्मारकासाठी उर्वरित रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा करण्याचे आठवले यांनी मान्य केल्याचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले. या स्मारकासंदर्भातील आराखडाही तयार करण्यात आला आहे. आराखड्यासह सविस्तर प्रस्ताव तयार करून तो पाठविण्यात आला आहे. महासभेच्या विषयपत्रिकेवर सातव्या क्रमांकाचा हा विषय असून याविषयी सदस्यांचीही मते विचारात घेतली जाणार आहेत. आराखड्यात काही सुधारणा असतील तर त्यांचाही विचार करून प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे महापौर विवेक कांबळे यांनी सांगितले आहे. आठवले यांच्याकडून प्रकल्पासाठी १२ लाख प्राप्त झाले असून सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनीही त्यांच्या निधीतून यास मदत करणार असल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)अंदाजपत्रक तयार : चार कोटी खर्च होणार महापालिकेच्या आर्किटेक्ट पॅनेलवरचे परीख अॅन्ड असोसिएटस् यांनी ३ कोटी ८१ लाख २0 हजार ८९७ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यास तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. हा आराखडा सुंदर झाल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यास पसंती दर्शविली आहे. सांगलीतील मोक्याच्या ठिकाणी हा भूखंड असून त्याचा लाभ नागरिकांना होईल, असे मत ठोकळे यांनी व्यक्त केले. महासभेत हा विषय चर्चेला आल्यानंतर सदस्यांना हा आराखडाही पाहण्यास देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आर्किटेक्ट पॅनेलवरचे परीख अॅन्ड असोसिएटस् यांनी ३ कोटी ८१ लाख २0 हजार ८९७ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यास तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. हा आराखडा सुंदर झाल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यास पसंती दर्शविली आहे. सांगलीतील मोक्याच्या ठिकाणी हा भूखंड असून त्याचा लाभ नागरिकांना होईल, असे मत ठोकळे यांनी व्यक्त केले. महासभेत हा विषय चर्चेला आल्यानंतर सदस्यांना हा आराखडाही पाहण्यास देण्यात येणार आहे. निधी मिळेपर्यंत पाठपुरावा करणार : विवेक कांबळे खासदार आठवले, महापालिकेतील सत्ताधारी नेते मदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. प्रस्ताव पाठविल्यानंतर तो तातडीने मंजूर होऊन निधी मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची माहिती महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी दिली.
सांगलीत उभारणार महापुरुषांचे स्मारक
By admin | Published: October 12, 2015 11:48 PM