सांगली : जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने एक होऊन काम केले पाहिजे. या दोन्ही विभागात असलेला ‘इगो’ बाजूला ठेवून काम केल्यास जिल्ह्यातील अनेक बेकायदेशीर घटनांना निश्चितच आळा बसू शकतो. यासाठीच यापुढे महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांकडून होणारे हल्ले व बेकायदेशीर वाळू वाहतूक लक्षात घेता वाळू प्लॉटच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, वाळू माफियांवर कारवाईसाठी प्रसंगी मोक्काचा वापर करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी बुधवारी दिल्या. महसूल अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी महसूल व पोलिस प्रशासनाने एकदिलाने काम केल्यास अनेक बेकायदेशीर गोष्टींना आळा बसू शकतो. मात्र, यात दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांचा ‘इगो’ कारणीभूत ठरत असल्याने यापुढे जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीत जिल्ह्यात आरोपींची निर्दोष मुक्तता होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोन्ही विभागातील समन्वयाच्या अभावामुळे हद्दपारीचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या निवडणुका व सणांच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीचे व गुंडांवर मोक्कातंर्गत कारवाई करण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जिल्ह्यात एक तालुका आणि एका पोलिस स्टेशनमध्ये गावांचा समावेश हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित राहिला आहे. निवडणुकांच्या काळात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे त्याच तालुक्यातील पोलिस स्टेशनला गावे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कासेगाव पोलिस ठाण्याला शिराळा तालुक्यातील दहा गावे जोडण्यात आली आहेत. तर मिरज तालुक्यातील सलगरे व चाबूकस्वारवाडी गावे कवठेमहांकाळ तालुक्याला जोडण्यात आली आहेत. ही गावे त्या-त्या तालुक्याच्या पोलिस स्टेशनला जोडण्याचा निर्णय झाला. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करते मात्र, तरीही पोलिस ठाण्याच्या आवारातून वाहने पळवून नेली जातात, ही बाब गंभीर आहे. यापुढे अशी कारवाई दोन्ही विभागाने संयुक्तपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी प्लॉटच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले. याठिकाणचे फुटेज दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनीही सूचना मांडत त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रत्येक तहसीलला मिळणार ‘जॅमर’ महसूल विभागाने कारवाई केलेले वाळूच्या वाहनांचे चालक तिथेच वाहन सोडून पलायन करतात व नंतर वाहन घेऊन जातात. हा प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना वाहन जाम करण्याचे ‘जॅमर’ देण्यात येणार असून, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘जॅमर’ लावून कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्यातील एक पोलिस ठाणे बनणार ‘आदर्श’ पोलिस ठाण्यांमध्ये सर्वसामान्यांना भीती वाटता कामा नये. यासाठी पोलिस ठाणे हे नागरिकांना आपल्या अन्यायाला दाद मागण्याचे हक्काचे ठिकाण वाटले पाहिजे. त्यासाठी जिल्ह्यातील किमान एक पोलिस ठाणे ‘आयडियल’ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गायकवाड यांनी यावेळी दिले. त्यासाठी दोन्ही विभागांनी प्रयत्न करून आदर्श पोलिस ठाणे बनविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शहरातील समस्यांवर पुढील आठवड्यात बैठकमहापालिका क्षेत्रातील वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, सिग्नल यंत्रणा सक्षम होणे गरजेचे आहे. त्याचबरोबरच अतिक्रमणांचा प्रश्न आणि आठवडी बाजार खुल्या भूखंडावर भरविण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आयुक्त, पोलिस प्रशासन यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
वाळू माफियांवर कारवाईसाठी प्रसंगी मोक्का
By admin | Published: June 23, 2016 12:18 AM