जत : येथील नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील अतिक्रमण हटवून पुतळा बसविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी जत तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने आज (मंगळवार) जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून येथे उपोषण सुरूकरण्यात आले आहे.आंबेडकरनगर जत येथून मोर्चास सकाळी सुरुवात झाली. महाराणा प्रताप चौक, गांधी चौक व शिवाजी चौक मार्गावरून मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर येथे उपोषणास सुरुवात करण्यात आली. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नियोजित उद्यानात बसविण्यासाठी पुतळ््याच्या प्रतिकृतीला शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिली आहे. शासनाच्या मुख्य वास्तू शास्त्रज्ञाकडून पुतळा चबुतरा आराखड्यास मान्यता मिळाली आहे. पुतळा बसविण्यास परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तालुका स्मारक समितीची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. दरम्यान, तहसीलदार डी. एम. कांबळे व प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दोन दिवसात जागेची मोजणी आणि आठ दिवसात अतिक्रमण हटविण्याबाबतचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.मोर्चा आणि उपोषण कार्यक्रमात अशोक कांबळे, प्रभाकर सनमडीकर, संजय दऱ्याप्पा कांबळे, संजय मल्लाप्पा कांबळे, सुरेश कांबळे, संतोष कांबळे, अर्जुन कांबळे, सुमन शिंगे, रमाताई कांबळे, नंदा कांबळे, जी. एम. कांबळे, उत्तम साबळे, हणमंत कांबळे, सुनील कसबे, बंडू शेषवरे, जी. एम. वाघमारे सहभागी झाले होते. (वार्ताहर)
आंबेडकर पुतळ्यासाठी जत तहसीलवर मोर्चा
By admin | Published: January 06, 2015 11:28 PM