सांगली : राज्यात गुटखा बंदी असताना इतर राज्यातून सर्रास गुटख्याची तस्करी होत आहे. यात बड्या गुटखा तस्करांना अन्न व औषध प्रशासनाकडून अभय दिले जात आहे तर पानपट्टीचालकांवर मात्र कारवाईचा बडगा उगारून त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. याविरोधात येत्या मंगळवारी आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे राज्य पान व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सूर्यवंशी म्हणाले की, राज्यात २०१२ला गुटखाबंदी झाली. त्याला सांगली जिल्हा पान असोसिएशनने पाठिंबा दिला. पानपट्टीतून गुटखा विक्री बंद केली, तरीही कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक होत आहे. किराणा दुकान व इतर ठिकाणी त्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. पण त्यांच्यावर अन्न व औषध विभागाकडून कधीही कारवाई होत नाही. याउलट गोरगरीब पानपट्टीचालकांवर कारवाई करून त्रास दिला जात आहे.
जिल्ह्यात अनेक बडे व्यापारी गुटख्याची तस्करी करतात. या तस्करीत प्रशासनही सामील आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा जिल्ह्यात येऊ शकत नाही. या बड्या तस्करांवर जुजबी कारवाई केली जाते. उलट राज्यात गुटखा येणार नाही, यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. परंतु, अन्न व औषध विभागाने दुटप्पी भूमिका घेऊ नये. या विभागाने सर्वसामान्य पानपट्टीचालकांना त्रास देणे न थांबविल्यास त्यांच्याही भानगडी बाहेर काढू, असा इशाराही सूर्यवंशी यांनी दिला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर नांगरे, एकनाथ सूर्यवंशी, युसूफ जमादार उपस्थित होते.