सांगली : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ६१८ नागरिकांकडून १३ लाख ७६ हजार ६०० रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.यामध्ये महापालिका क्षेत्रातील विना मास्क फिरणाऱ्या ५३३ नागरिकांकडून १ लाख ६० हजार रूपये तर ग्रामीण क्षेत्रात विना मास्क फिरणाऱ्या 6 हजार 85 नागरिकांकडून आत्तापर्यंत 12 लाख 16 हजार 600 रूपयांची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.कोविड नियमांचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने जिमखाना, क्लब, नाईट क्लब, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि. 20 फेब्रुवारी पासून आजअखेर पर्यंत या पथकांनी ग्रामीण क्षेत्रात सुमारे 4 हजार 101 ठिकाणी भेटी देवून पहाणी केली आहे. यामध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करणारी 10 मंगल कार्यालये, 27 रेस्टॉरंट, 3 शॉपिंग मॉल, 1 धार्मिक स्थळ, 10 इतर सार्वजनिक स्थळे यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख 7 हजार 700 रूपये दंड
महानगरपालिका क्षेत्रात सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 52 ठिकाणी 36 हजार रूपयांचा दंड, एका मॉलला 20 हजार रूपये, 5 मंगल कार्यालयांना 8 हजार रूपये, एका केटरिंगला 10 हजार रूपये, एका फेस्टीवल मॉलला 20 हजार रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 97 जणांना 9 हजार 700 रूपये असा एकूण 2 लाख 7 हजार 700 रूपये दंड करण्यात आला आहे.