लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्याला शुक्रवारी दिवसभर पावसाने झोडपले. सांगली शहरासह पश्चिम भागातील गावांना पुराचा तडाखा बसला. सांगलीत कृष्णेचे पाणी संध्याकाळपर्यंत पात्रातच होते, पण ४०हून अधिक गावांचा संपर्क मात्र तुटला होता.
चिकुर्डेसह काही ठिकाणी जनावरे पुरात वाहून गेली. डिग्रज, मौजे डिग्रजचा, ब्रह्मनाळ गावांचा संपर्क तुटला. पुराची शक्यता पाहून सांगली एसटी आगारातील ९८ बसेस तासगाव, इस्लामपूर, मिरज व चंदनवाडी कार्यशाळेत हलवण्यात आल्या. भिलवडीमध्ये बाजारपेठेत पाणी शिरले होते. सुखवाडी, चोपडेवाडी, भुवनेश्वरवाडीचा संपर्क सकाळीच तुटला. मांगले परिसरात महापुराने २००५ व २०१९ चे विक्रम मोडले आहेत. वाळव्यात कणेगाव व भरतवाडीत नागरिकांनी जनावरांसह गाव सोडले. चांदोलीत २४ तासांत ५७४ मिमी इतका विक्रमी पाऊस
झाला. गुरुवारी सकाळपासूनच्या २४ तासांत तब्बल ५७४ मिलीमीटर पाऊस कोसळला. धरणातील पाणीपातळी सव्वापाच मीटरने वाढली. पाणीसाठा १३.५ टीएमसीने वाढला. त्यामुळे सांगलीकरांच्या चिंतेत भर पडली. सांगलीत आयर्विन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६ वाजता कृष्णेची पाणीपातळी ३८ फूट होती, दुपारी दोनपर्यंत ती ४३ फुटांपर्यंत गेली. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी, शिवशंभो चौक, जुना बुधगाव रस्ता आदी भागांत पाणी शिरले. कृष्णेची पाणीपातळी ५२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली. या पातळीला सांगली शहराला महापुराचा फटका बसतो, त्यामुळे प्रमुख बाजारपेठातील व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करायला सकाळपासूनच सुरुवात केली होती.