सांगली : हरिपूर ते कोथळीदरम्यान कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर आता या पुलाला विरोध वाढू लागला आहे.
हा पूल हवाच कशाला, असा सवाल हरिपूरच्या ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यात रस्त्याचा दर्जा जिल्हा मार्ग केल्याने ग्रामस्थांची घरे, शेतजमिनीच्या संपादनाबाबत गोंधळ उडाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीही रस्त्यामध्ये जाणार असल्याचा आक्षेप नोंदविला जात आहे. ग्रामस्थांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याची गरज असून त्यावर लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन काय तोडगा काढते, हे महत्त्वाचे आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या हरिपूर-कोथळी पुलाचे काम सध्या सुरू झाले आहे. या कामासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. पुलाचे काम कोथळी गावाच्या बाजूने सुरू आहे. आता हरिपूरच्या ग्रामस्थांनी पुलाला विरोध सुरू केला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीनेही ठराव केला आहे.
या कामाच्या सुरूवातीला ग्रामपंचायतीनेही हिरवा कंदील दाखविला होता. पण आॅगस्ट महिन्यात कृष्णा-वारणा नदीला महापूर आला आणि या पुलाबाबतची भूमिका ग्रामस्थांनी बदलली. २००५ च्या महापुरात हरिपूरच्या विस्तारित भागात पाणी शिरले होते.
पण यंदाच्या महापुरात मात्र गावठाणातही पाणी आल्याने पुराची धडकी ग्रामस्थांना बसली. त्याशिवाय हरिपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातच रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्याने शेतजमिनींचे, घरांचे नुकसान होण्याची भीती ग्रामस्थांत निर्माण झाली. त्यातून विरोध वाढू लागला.