सांगली हायस्कूल परीक्षा केंद्रावर एमपीएससी परीक्षेसाठी अशी गर्दी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी पार पडली. शहरात २७ केंद्रांवर सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना हातमोजे, सॅनिटायजर असे किट देऊनच वर्गात सोडण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत जनरल स्टडी आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत बुद्धिमत्ता चाचणी असे दोन पेपर झाले. एकूण आठ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. त्यासाठी २७ उपकेंद्रांवर २७ उपकेंद्रप्रमुख, १२४ पर्यवेक्षक, ४३२ समवेक्षक, ६० मदतनीस लिपिक, ५४ शिपाई व ३६ वाहनचालकांची नियुक्ती होती. उपजिल्हाधिकारी दर्जाचे सात समन्वय अधिकारी व दोन भरारी पथकांनी नियंत्रण केले.
कोरोनामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या आठजणांना प्रक्रियेतून वगळण्यात आले. राखीव कर्मचारी नियुक्त केले. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना १५ मिनिटे अगोदर वर्गात सोडले. प्रवेशपत्र पाहूनच प्रवेश देण्यात आला.
शहरात सांगली हायस्कूल, पुरोहित कन्या प्रशाला, जिल्हा परिषदेजवळील उर्दू हायस्कूल, वालचंद महाविद्यालय आदी केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची तोबा गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवले.
चौकट
परीक्षेकडे अनेकांनी फिरवली पाठ
गेल्या वर्षभरात पाचवेळी एमपीएससीची परीक्षा स्थगित झाली. गेल्या रविवारची परीक्षादेखील ऐनवेळी रद्द करण्यात आली. शासनाच्या व लोकसेवा आयोगाच्या धरसोडीला कंटाळून अनेक विद्यार्थ्यांनी रविवारच्या परीक्षेकडे पाठ फिरवली. आठ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, प्रत्यक्षात सहा हजार २१२ जणांनीच परीक्षा दिली. दोन हजार ७२० जणांनी पाठ फिरवली. काहींनी रेल्वेच्या ऑनलाइन परीक्षेला प्राधान्य दिले, तर काहींनी एप्रिलमध्ये होणाऱ्या संयुक्त परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. परीक्षेची ॲन्सर की आठवडाभरात आयोगाकडून प्रसिद्ध होईल, त्यानुसार परीक्षार्थींना आपल्या गुणांचा व एकूण मेरिटचा अंदाज येऊ शकेल.