सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. दि. १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण १०४ पूरबाधित गावांतील सुमारे ३४ हजार ९१७ कुटुंबांतील ३ लाख ११ हजार ४८५ लोक व ४२ हजार ४९४ जनावरे विस्थापित झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील ११ हजार ३४ कुटुंबांतील ४९ हजार ५३० व्यक्ती आणि १६ हजार ३६३ जनावरांचे प्रशासकीय कँपमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. २३ हजार ८८३ कुटुंबांतील १ लाख २४ हजार ९५५ व्यक्ती आणि २६ हजार १३१ जनावरे संबंधितांनी नातेवाईक व स्वत:च्या सोयीनुसार विस्थापित केली आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील १ लाख ३७ हजार व्यक्ती नातेवाईक व स्वत:च्या सोयीनुसार विस्थापित झाल्या आहेत.
डॉ. चौधरी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील ३ हजार ८८१ कुटुंबांतील १५ हजार ५२२ लोक व ७२० जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील १ लाख ३७ हजार व्यक्ती नातेवाईक व स्वत:च्या सोयीनुसार विस्थापित आहेत.
मिरज तालुक्यातील २० गावांतील १० हजार ४७६ कुटुंबांतील ५२ हजार ५१४ लोक व १२ हजार ६६१ जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील २५ गावांतील ७ हजार ६५१ कुटुंबांतील ३७ हजार ७२० लोक व ११ हजार २५१ जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील ३७ गावांतील १२ हजार २५६ कुटुंबांतील ६५ हजार ५४७ लोक व १५ हजार १३५ जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील २१ गावांतील ६५३ कुटुंबांतील ३ हजार १८२ लोक व २ हजार ७२७ जनावरांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.