लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वारंवार सूचना देऊनही संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने बुधवारी अचानकच अशा लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. सकाळी आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह आरोग्य पथक रस्त्यावर उतरले आणि माॅर्निंग वाॅकला आलेल्या ६० जणांची कोरोना चाचणी केली. त्यात एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आली.
कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंद केल्या आहेत. नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली. तशा सूचनाही नागरिकांना महापालिका प्रशासनाने दिल्या. काही नागरिकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. तरीही शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यात महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज २०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.
वारंवार समज देऊनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे अशा लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला. सकाळी माॅर्निंग वाॅकला बाहेर फिरणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे अचानक बुधवारी सकाळी आयुक्तांसह आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव पाटील, डाॅ. आशा पाटील, डाॅ. वर्षा पाटील, स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे, धनंजय कांबळे यांचे पथक रस्त्यावर उतरले. न्यू प्राईड मल्टिपेक्सनजीकच्या चौकात माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी सुरू केली. तसेच कामानिमित्त या रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यात आली. एकूण ६० लोकांची चाचणी करण्यात आली. त्यात एक व्यक्ती पाॅझिटिव्ह सापडला.
चौकट
कुत्रे फिरविण्यास आले आणि पाॅझिटिव्ह निघाले
माधवनगर शासकीय विश्रामगृहाकडून बायपासकडे जाणाऱ्या या रस्त्यावर सकाळी फिरणाऱ्यांची गर्दी असते. एक ६५ वर्षीय व्यक्ती पाळीव कुत्रे घेऊन फिरण्यासाठी आले होते. त्यांना कसलीच लक्षणे नव्हती. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ते पाॅझिटिव्ह आले.
कोट
शहरात सकाळ, सायंकाळी फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात कोणी पाॅझिटिव्ह असेल तर कोरोना संसर्ग वाढू शकतो. त्यासाठी अचानक अशा लोकांची कोरोना चाचणीचा निर्णय घेतला. मिरज आणि कुपवाडमध्येही अशा पद्धतीने विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाईल. त्यातील पाॅझिटिव्ह लोकांना उपचार अथवा विलगीकरणात ठेवण्यात येईल.
- नितीन कापडणीस, आयुक्त