इस्लामपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये इस्लामपूर शहरातील ५-१० टक्के रुग्णालयांमधील मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. त्यामुळे तेथील उपचाराचे आणि रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी ऑडिट होणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पाटील यांनी तहसील कार्यालयातील आढावा बैठकीचा तपशील सांगितला. शिराळा तालुक्यात रुग्णांचे प्रमाण कमी राखण्यात यश येत आहे. लॉकडाऊनची मनापासून अंमलबजावणी केल्यास वाळवा तालुक्यातील रुग्णसंख्याही आटोक्यात आणता येईल. तालुक्यातील काही रुग्णालयांबाबत रुग्णांचे नातेवाईक, नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून तक्रारी आल्या आहेत. मर्यादेपेक्षा अधिक खर्च आणि बिले आकारली जात आहेत. याचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. रुग्णाला सोडण्यापूर्वी बिलाची तपासणी व्हावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेस तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ते म्हणाले, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून येत असलेल्या मागणीप्रमाणे बेडसंख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे. लॉकडाऊनचा अवलंब मनापासून केल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल.
ते म्हणाले, केंद्र सरकारच्या लसीकरण अॅपमध्ये काही दोष आहेत. नागरिकांना त्यांचे मूळ वास्तव्य असलेल्या शहर अथवा तालुक्यातच लसीकरणाची मुभा या अॅपमधून मिळायला हवी. राज्य सरकारला स्वत:चे अॅप तयार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, प्रदेश चिटणीस अरुण कांबळे, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, संजय कोरे, अॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, पिरअली पुणेकर उपस्थित होते.
चौकट
शहरात ३८२ जणांचा मृत्यू
आढावा बैठकीत मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सादर केलेल्या रुग्णालयनिहाय मृत्युदराची माहिती शहाजी पाटील व अॅड. चिमण डांगे यांनी दिली. त्यामध्ये सप्टेंबर २०२० ते ८ मे २०२१ या कालावधीत ३८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील ९१, तालुका आणि जिल्ह्यातील १६६, तर बाहेरील जिल्ह्यातील १२५ जणांचा समावेश आहे. रुग्णालयनिहाय मृत्यूची संख्या अशी : आधार (३५), लक्ष्मीनारायण (२३), उपजिल्हा रुग्णालय (४४), शुश्रूषा (१६), इस्लामपूर मल्टिस्पेशालिटी (२०), प्रकाश मेमोरियल (२६) आणि प्रकाश हॉस्पिटल (२१८).