शरद जाधव - सांगली--एका क्लिकसरशी जगाशी जोडणारे फेसबुकसारखे माध्यम... व्हॉटस् अॅपवरचे अनेक ग्रुप... यासारख्या अनेक माध्यमांच्या जाळ्यात आजची पिढी गुरफटून गेली असताना, त्यांचा पुस्तकांकडील ओढाही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला तरुणांचा कल आणि त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या समृध्द ग्रंथसंपदेमुळे ग्रंथालयांसह अभ्यासिकेतील तरुणांचा सहभाग वाढत आहे. दुसरीकडे सेवानिवृत्त ज्येष्ठांनाही उतरत्या वयात ग्रंथांचा आधार मिळत असल्याचे चित्र आहे. प्रत्येकाच्या हातात स्थिरावलेल्या ‘स्मार्ट’ फोनने जगाला कवेत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त ‘लोकमत’ने वाचन जगताचा आढावा घेतला. सध्या वाचकांचा विविधांगी पुस्तके वाचण्याकडे कल असून पुस्तकांनाही मागणी असल्याचे दिसून आले. तथापि मराठी साहित्यात बालसाहित्याला महत्त्व असताना, बालवाचक मात्र ग्रंथालयातून गायब झाल्याचे चिंताजनक चित्र आहे. पूर्वी शाळांचा अभ्यास झाल्यानंतर आवर्जून बालकथा वाचणारी बच्चे कंपनी आता टीव्ही आणि कॉम्प्युटरवरील गेममध्ये गुरफटली आहे. येथील नगरवाचनालयात आवर्जून लहान मुलांसाठी पुस्तक वाचन स्पर्धेसारखा उपक्रम राबविण्यात येतो. मुलांनी वाचन केले पाहिजे, असा पालकांचा आग्रह असेल, तर घरात आजही पुस्तके वाचली जात असल्याचे ग्रंथपालांनी सांगितले. मोबाईलच्या जमान्यात तरूणाई आणि ललित ग्रंथांमध्ये काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला असला तरी, तरुणांनी संदर्भग्रंथ वाचनाकडे मात्र दुर्लक्ष केले नसल्याचे दिसून आले. सध्या स्पर्धा परीक्षांकडे तरुणांचा ओढा वाढत आहे. त्यासाठी तरुणांनी अनेक संदर्भग्रंथ चाळण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. मावळतीकडे झुकलेल्या ज्येष्ठांचा पुस्तक वाचनाकडील ओढा वाढल्याचे चित्र आहे. निवृत्तीनंतरचे आयुष्य शारीरिक व्याधी आणि नकारात्मक मानसिकतेत घालविण्यापेक्षा, या वयोगटातील ज्येष्ठांनी पुस्तकांशी गट्टी जमविली आहे.‘ई-बुक’च्या जमान्यातही पुस्तकांना मागणी वाढली केवळ फेसबुक नव्हे, तर संकेतस्थळांच्या माध्यमातून आणि मोबाईलवरील विविध अॅप्समुळे वेगवेगळी पुस्तके उपलब्ध होत असली तरी, आजही हातात पुस्तके हातात घेऊन वाचण्यात जी मजा आहे, ती ‘ई-बुक’ वाचण्यात नाही. त्यामुळेच शहरातील अनेक पुस्तकालयांमध्ये पुस्तकांना चांगली मागणी आहे. वाचनालयांच्या सदस्य संख्येतही वाढ होत आहे. आजच्या संगणकाच्या युगात वाचन संस्कृती कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात असली तरी, सुदृढ समाजासाठी ग्रंथ आवश्यक आहेत. वाचक संस्कृती वाढविण्यासाठी वाचन प्रेरणा दिनासारखे उपक्रम प्रभावी ठरणार आहेत. वाचनालयात हातात पुस्तके घेऊन सोयीने वाचण्यातील महत्त्व अबाधित आहे. मुलांनी शिकण्याबरोबरच वाचन वाढविल्यास भावी पिढी प्रगल्भ निर्माण होईल.- श्रीकांत जोशी, अध्यक्ष, सांगली जिल्हा नगरवाचनालय.
ग्रंथांच्या सान्निध्यात ज्येष्ठांचीच गर्दी सर्वाधिक!
By admin | Published: October 14, 2015 11:17 PM