सांगली : वानलेसवाडी येथे जागेच्या वादातून संगीता राजाराम मासाळ (वय ५०) यांचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी संशयित मायलेकास सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शिवाजी बाळू मासाळ, लक्ष्मी बाळू मासाळ (रा. वानलेसवाडी) अशी त्या दोघांची नावे आहेत. तर तीन अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठवण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत संगीता मासाळ कुटुंबासह वानलेसवाडी येथे राहत होते. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. २००१ साली मृत पती राजाराम यांनी भाऊ चंद्रकांत यांच्याकडून एक गुंठा जागा विकत घेतली होती. संशयित लक्ष्मी मासाळ हिने चंद्रकांत यांना ती जागा परत घेण्यासाठी फूस लावली. त्यामुळे चंद्रकांत आणि राजाराम यांच्यात काही वर्षांपासून वाद सुरू होता. जागा परत देण्यास नकार दिल्याने वाद धुमसत होता. पतीच्या निधनानंतर मृत संगीता यांनी संबंधित जागा शेजाऱ्यास नऊ लाखांना विकली.
मिळालेल्या पैशातून स्वतःच्या जागेत बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी चंद्रकांत यांनी न्यायालयात धाव घेत बांधकामास स्थगिती मिळवली. चंद्रकांतसह पत्नीचा सांभाळ करू; परंतु ती जागा तुम्ही परत घ्या, असा तगदा संशयित लक्ष्मी हिने लावला. यातून अनेकदा वादावादीही झाली. एकमेकांना शिवीगाळ आणि खुन्नस देण्याच्या घटनाही घडल्या. रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मृत संगीता घरात जेवण करत असताना संशयित घरात घुसले. त्यांनी संगीता यांच्यावर कोयता, सत्तूरने डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर वार केले.
त्यात त्यांचा मृत्यू झाला. खुनाच्या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी संशयित शिवाजी मासाळ आणि त्याची आई लक्ष्मी यांना अटक केली. गुन्ह्यातील अन्य तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. संशयित दोघांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठवण्यात आले. पोलिस निरीक्षक संजय मोरे तपास करत आहेत.