दरीबडची : मुलासाठी स्थळ पाहून गुड्डापूरहून (ता. जत) धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे दुचाकी (क्र. एम. एच १० डी ए ४५३९) वरून निघालेल्या माजी सैनिक गणपती माने यांच्या दुचाकीस सोरडी साठवण तलावाकडे मोकळा भरधाव निघालेल्या डंपरने (क्र. के.ए ५०,बी २४९४) पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेल्या मंदा गणपती माने (वय ५५,रा धुळगाव,ता.कवठेमहांकाळ) या महिलेचा डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गणपती माने गंभीर जखमी झाले.ही घटना आज, गुरुवारी सकाळी गुड्डापूर रस्त्यावरील कदम वस्तीजवळ घडली. जखमी गणपती माने यांच्या चेहरा, डोक्याला मार लागला आहे. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कवठेमहांकाळ तालुक्यातील धुळगाव येथील माजी सैनिक गणपती माने व पत्नी मंदा माने हे दांपत्य दुचाकीवरून मुलाला सकाळी मुलगी पाहण्यासाठी जत पूर्वभागातील गुड्डापूर येथे गेले होते. मुलगी बघून परतत असताना सोरडी साठवण तलावातील सकाळी माती भरुन गेलेला डंपर हा गुड्डापूर येथे माती ओतून मोकळा सोरडी साठवण तलावाकडे येत होता. या भरधाव डंपरने कदम वस्तीजवळ आल्यावर दुचाकीस मागून जोराची धडक दिली.या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या मंदा माने रस्त्यावर उडून पडल्या. त्याचवेळी त्यांच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेले. डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. मेंदू रस्त्यावर पडला होता. डंपर धडक देवून ४०० मीटर अंतरावर जाऊन थांबला चालक डंपर थांबवून पळून गेला. या घटनेची माहिती जत पोलीस ठाण्याला दिली.तर दुसरीकडे दुचाकीस्वार गणपती माने यांच्या चेहरा, डोक्याला मार लागला आहे. हाताचा खुबा, पाय फँक्चर झाला आहे. अपघात झाल्यानंतर बराच वेळ जखमी रस्त्यावर पडून होते. दरम्यान, ह.भ.प तुकाराम बाबा जतला निघाले होते. त्यांनी जखमीला गाडीतून उपचारासाठी माडग्याळला घेऊन गेले. प्राथमिक उपचार करुन सांगलीला पाठविले. सध्या सांगलीमध्ये उपचार सुरू आहेत.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.
Sangli: मुलाला स्थळ पहायला गेले अन् जीवावर बेतले; डंपरच्या धडकेत आई जागीच ठार, वडील गंभीर जखमी
By अशोक डोंबाळे | Published: May 02, 2024 5:17 PM