शिराळा : तडवळे (ता. शिराळा) येथे घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून रस्त्यावर खेळत असलेल्या दोन लेकरांच्या अंगावर जात असल्याचे पाहून माउली जिवाच्या आकांताने धावली; पण धावताना अचानक पाय घसरला आणि ट्रॅक्टरला जोडलेला नांगराचा फाळ तिच्या डोक्यात घुसला आणि ट्रॅक्टर जागीच थांबला. रक्तबंबाळ झालेल्या माउलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही मुले बचावली; पण तिचा मृत्यू चटका लावून गेला.संचिता संपत पाटील (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. तडवळे येथे गावातच संपत पाटील यांचे घर आहे. त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर मंगळवारी नेहमीप्रमाणे रस्त्याकडेला उभा केला होता. मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान त्यांची पत्नी संचिता अंगणातील गोठा साफ करत होती, तर दोन्ही मुले कृषांत (वय २) व दुर्वा (वय ४) रस्त्यावर खेळत होती. रस्त्याच्या उतारामुळे अचानक ट्रॅक्टर सरकला. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांच्या दिशेने ट्रॅक्टर जात असल्याचे पाहून संचिता आरडाओरडा करीत ट्रॅक्टरच्या दिशेने धावल्या. मात्र, अचानक पाय घसरला आणि त्या ट्रॅक्टरच्या मागे जोडलेल्या नांगराच्या फाळावर जाऊन आदळल्या. नांगराचा अणकुचीदार फाळ डोक्यात घुसल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. ट्रॅक्टरही थांबला. हा प्रकार पाहून मदतीसाठी धावलेल्या शेजाऱ्यांनी तत्काळ दोन्ही मुलांना ट्रॅक्टरसमोरून बाजूला केले. गंभीर जखमी झालेल्या संचिता यांना तातडीने इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.याबाबत शरद बबन पाटील यांनी शिराळा पोलिस ठाण्यात वर्दी दिली असून, हवालदार राजेंद्र माने तपास करीत आहेत. मृत संचिता यांच्यावर रात्री उशिरा तडवळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू, सासरे, दोन दीर, भावजय असा परिवार आहे. दाेन लेकरांना वाचविताना माउलीला मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रॅक्टर लेकरांच्या अंगावर जात असल्याचे पाहून माउली जिवाच्या आकांताने धावली, मुले बचावली; पण..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:13 PM