मिरज : तालुक्यात बेडग येथे वेडाच्या भरात शंकर मायाप्पा भानुसे (वय ३५) या तरुणाने मांसाहारी जेवण दिले नसल्याच्या कारणावरून काठीने मारहाण करून आई नीलाबाई मायाप्पा भानुसे (वय ५५) हिचा खून केला. आईचा खून करून पोलीस ठाण्यात हजर झालेल्या शंकर भानुसे याने आईला मारल्याची कबुली दिली. बेडग येथील माय्याप्पा भानुसे व नीलाबाई भानुसे या गरीब शेतमजूर दाम्पत्याचा हा मुलगा वेडसर आहे. आज सकाळी वडील माय्याप्पा हे शेतात कामाला गेल्यानंतर शंकर याने आईला मांसाहारी जेवण तयार करण्यास सांगितले. मात्र आईने शाकाहारी जेवण केले. या कारणावरून शंकरने आईसोबत भांडण काढले. नीलाबाई या शंकरकडे दुर्लक्ष करून घरासमोर असलेल्या शेतात गवत काढायला गेल्या. गवत काढत असताना शंकर हा वेताची जाड काठी घेऊन तेथे आला. त्याने काठीने नीलाबाई यांच्या डोक्यात जोराचा प्रहार केला.ाारहाणीत डोक्याची कवटी फुटून नीलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. आईच्या खुनानंतर कोणालाच काही न सांगता शंकर खुनासाठी वापरलेली रक्ताळलेली काठी घेऊन थेट मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. अंडी, मटणाचे जेवण करीत नाही, छळ करते म्हणून आईला मारून टाकल्याची माहिती त्याने दिल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे व पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचल्यानंतर शेतातील पिकात रक्ताच्या थारोळ्यात नीलाबाई यांचा मृतदेह सापडला. वेडाच्या भरात आईच्या खूनप्रकरणी संशयित शंकर भानुसे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. खुनाच्या घटनेमुळे बेडग गावात खळबळ उडाली होती. शंकर हा वेडाच्या भरात नेहमी हातात काठी व लोखंडी रॉड घेऊन फिरायचा. कोणताही कामधंदा नसल्याने व वेडसर असल्याने शंकर याचा विवाह झाला नाही. भानुसे कुटुंबियांची दीड एकर शेती आहे. शंकर याचा भाऊ कामानिमित्त कर्नाटकात सासूरवाडीत राहतो. शंकर यास मांसाहारी जेवण आवडत होते. मात्र भानुसे कुटुंबियांची परिस्थिती गरिबीची असल्याने नीलाबाई या कधीतरी शंकरला मांसाहारी जेवण करून देत असत. मात्र बुधवारी सकाळी आईने मांसाहारी जेवण केले नसल्याच्या रागातून शंकरने आईची हत्या केली. खुनानंतर शंकर बेडगेतून चालत तीन तासानंतर दुपारी मिरजेत पोलीस ठाण्यात हजर झाला.
बेडगेत मनोरुग्ण मुलाकडून आईचा खून
By admin | Published: January 15, 2015 12:17 AM