जतमधील घटना : धारदार शस्त्राने छातीवर वारजत : जत येथे आई दारू पिण्यासाठी पैसे देत नाही, म्हणून मुलाने तिचा निर्घृण खून केला. मंजुळा राजाराम जाधव (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर संशयित आरोपी श्रीकांत राजाराम जाधव (३०, रा. दुधाळ वस्ती जत) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मृत मंजुळा हिची मुलगी स्वाती दयानंद गायकवाड (रा. जाडरबोबलाद, ता. जत) हिने जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
जत शहरालगत असलेल्या दुधाळ वस्ती या उपनगरात श्रीकांत जाधव व त्याची आई मंजुळा जाधव हे दोघे एकत्र राहत होते. मंजुळा जाधव या पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या खानावळीत काम करून घर चालवत होत्या, तर श्रीकांत जाधव हा बेरोजगार आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. आईकडून दारूसाठी पैसे मागून घेऊन तो मद्य प्राशन करत होता. त्याच्या सततच्या पैसे मागण्याला कंटाळून त्याची आई त्याला काही तरी काम करण्याची सारखी सूचना करत होती. त्यामुळे तो आईवर चिडून होता. गुरुवारी रात्री तो मद्य प्राशन करून घरी आला. त्यावेळी आई घरात झोपली होती. त्याने आईला आवाज दिल्यानंतर तिने दरवाजा उघडला. त्यावेळी त्याने अचानक आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या केसाला धरून फरफटत घरासमोरील रस्त्यावर ओढत आणले. ती खाली पडल्यावर धारदार चाकूने त्याने तिच्या छातीवर जोरदार वर्मी वार केला. एका वारातच ती रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत निपचित पडली.
गंभीर जखमी अवस्थेत रक्तस्त्राव होऊन मंजुळा यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत याने चाकूहल्ला केल्यानंतर मंजुळा जाधव यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून या परिसरातील काही नागरिक तेथे आले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती नागरिकांनी फोनवरून जत पोलिसांना दिली.
पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर श्रीकांत जाधव याने अंधाराचा फायदा घेऊन तेथून पलायन केले. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश मोहिते करत आहेत. व्यसन असल्यामुळे श्रीकांत याला कुठेच काम मिळत नव्हते आणि काम नसल्याने व्यसन वाढतच होते. अखेर व्यसनामुळे त्याने आईची हत्या केली. या घटनेमुळे जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
व्यसन असल्याने कोणी कामावर घेईनाश्रीकांत जाधव याच्या वडिलांचे निधन झाले आहे. अडीच वर्षापूर्वी तो वडापच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. परंतु त्यानंतर तो व्यसनाधीन झाल्यामुळे त्याला कोणीही कामावर घेत नव्हते.