सांगली : महापालिकेतील भाजपच्या सत्तेला धोबीपछाड देत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने सत्तेचा सोपान आपल्या हाती घेतला आहे. महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासारख्या युवा नगरसेवकाला संधी मिळाली. आता पुढील अडीच वर्षात पारदर्शी कारभाराचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. सत्तेबाहेरील कारभाऱ्यांचा हस्तक्षेपाला लगाम घालून सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे.
चौकट
काळी खण सुशोभिकरण
शहरातील काळी खण सुशोभिकरणाचा प्रस्ताव बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. आता जिल्हा नियोजनमधून निधीसाठी प्रस्ताव पाठविला गेला आहे. त्याचा पाठपुरावा करून हा निधी मिळाल्यास सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात होई शकते. उर्वरित निधीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. त्याशिवाय कृष्णा नदी घाटाच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.
चौकट
शेरीनाला योजना
शेरीनाला योजनेच्या कामासाठी ५ ते ६ कोटीच्या निधीची गरज आहे. या योजनेची कामे पूर्ण झाल्यास कृष्णा नदीचे प्रदूषण थांबणार आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.
चौकट
नव्या उद्यानांची निर्मिती
तीन शहरात मोजकीच उद्याने आहेत. कुपवाड शहरात एकही उद्यान नाही. सध्याच्या आमराई, महावीर उद्यान व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासासोबतच नव्या उद्यानांच्या निर्मितीबरोबरच नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, खेळाचे मैदान, क्रीडांगणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद, नाना - नानी पार्क, नाट्यगृहे उभारण्याची गरज आहे.
चौकट
कुपवाड ड्रेनेज योजना
कुपवाड शहरात ड्रेनेज योजना नाही. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पण सांगली - मिरजेची ड्रेनेज योजना पूर्ण झाल्याशिवाय कुपवाड ड्रेनेज योजनेला मंजुरी मिळणार नाही. त्यासाठी आधी सांगली -मिरजेची योजना पूर्ण करण्याची गरज आहे.
चौकट
आरक्षणांचा बाजार रोखणे
शहरातील अनेक आरक्षणे उठवून त्याचा बाजार केला जात आहे. हा बाजार रोखून ही आरक्षणे नागरिकांसाठी विकसित करण्याची गरज आहे.
चौकट
घनकचरा प्रकल्प
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाबाबत मतमतांतरे आहेत. त्यामुळे नागरिक, सामाजिक संघटना, नगरसेवकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
चौकट
सर्वसाधारण अपेक्षा :
१. महापालिकेचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करून प्रशासन गतिमान करावे.
२. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच आर्थिक डोलारा उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत.
३. शहरातील वाहतूककोंडीची समस्या सोडवावी.
४. महापालिकेच्यावतीने सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यासाठी पावले उचलावीत
५. अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी ठोस उपाय करावेत
६. दैनंदिन कचरा उचलून स्वच्छतेवर अधिक भर द्यावा
७. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठ्यासाठी नियोजन करावे