सांगली : सांगली शहरातील भाजीपाला खरेदीदारांची गर्दी टाळण्यासाठी सोमवारपासून घाऊक भाजी मंडई विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये हलवली आहे. तेथे सकाळी फळांचे सौदे होतात, आता भाजीपाला विक्रीही सुरु झाल्याने गर्दी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला बाजार अन्यत्र हलविण्यात यावा, या मागणीसाठी बाजार समितीचे सचिव गुरुवारी महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहेत.
शहरातील भाजी मंडई सोमवारपासून फळ मार्केटमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे गोंधळ उडाला आहे. परिसरातून घाऊक भाजी खरेदीसाठी येणाऱ्यांची प्रचंड गर्दी फळ मार्केटमध्ये होत आहे. तेथे सकाळी फळांचे सौदे होतात, आता भाजीपाला विक्रीही सुरु आहे. फळे आणि भाजीपाल्याचे सौदे एकत्र निघत असल्यामुळे गर्दी आणखी वाढली आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी भाजीपाला बाजार अन्यत्र हलविण्यात यावा, असा आग्रह बाजार समितीच्या संचालकांचा आहे. बाजार अन्यत्र हलविण्यात यावा, या मागणीसाठी बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण हे गुरुवारी महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहेत.
चौकट
शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्त
घाऊक भाजीपाला घेण्यासाठी येणाऱ्यांना दीड हजार पास देण्यात आले आहेत. या पासशिवाय कोणालाही फळ मार्केटमध्ये प्रवेश मिळत नाही. येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तही मागवला आहे.