मिरज : दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत असताना, म्हैसाळ योजनेच्या थकबाकीचा बोजा सात-बारावर चढविण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत निषेध करण्यात आला. समितीतील एकमेव भाजप सदस्य सतीश निळकंठ यांनी निषेधाचा ठराव मांडून घरचा आहेर दिला. बोजा नोंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णयही सभेत झाला. सभागृहात होणाऱ्या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून पाठपुरावा होत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मासिक सभा सभापती दिलीप बुरसे यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती तृप्ती पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र कणसे यांच्या उपस्थितीत पार पडली. म्हैसाळ योजनेच्या पाणीपट्टीच्या थकबाकीचा बोजा शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याच्या निर्णयावर सभेत जोरदार चर्चा झाली. बोजा चढविण्याच्या निर्णयाबाबत सभेत राज्य शासनाला पंचायत समितीच्या भाजपच्या सदस्याने घरचा आहेर दिला. राज्य शासनाने म्हैसाळ योजनेच्या थकित पाणीपट्टीचा बोजा सात-बारावर चढविण्याचा निर्णय अन्यायी आहे, यामुळे पीक कर्ज मिळणार नाही. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या शासन निर्णयाचा निषेधाचा ठराव घेण्याची मागणी भाजपचे सदस्य सतीश निळकंठ यांनी केली. अशोक मोहिते, शंकर पाटील, सुभाष पाटील या सदस्यांनीही निळकंठ यांच्या मागणीला समर्थन दिले. एरंडोली जलवाहिन्यांसाठी रस्ता उखडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सभापती दिलीप बुरसे यांनी फैलावर घेतले. चर्चेत विरोधी पक्षनेते अरुण राजमाने, बाबासाहेब कांबळे, राणी देवकारे सहभागी होत्या. (वार्ताहर) ठरावाची अंमलबजावणी करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामसेवकांकडून झालेल्या गुंठेवारीच्या बोगस नोंदी, भ्रष्टाचारामुळे अपूर्ण राहिलेल्या पाणी योजनांच्या पाठपुराव्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याकडे पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याबद्दल सदस्य अशोक मोहिते यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत आंदोलनाचा इशारा देत मोहिते यांनी तसे लेखी पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
थकित पाणीपट्टी बोजाविरोधात आंदोलन
By admin | Published: November 07, 2015 11:16 PM