टाकळी : टाकळी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सुभाषनगरमधील ग्रामस्थांना गेल्या चाळीस वर्षांपासून मूलभूत सुविधा न देणाऱ्या टाकळी ग्रामपंचायतीचा सुभाषनगर येथे झालेल्या नागरी कृती समितीच्या बैठकीत निषेध करून भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे होते.टाकळी ग्रामपंचायत सदस्य गावच्या विकासापेक्षा स्वत:चाच विकास करीत आहेत. ‘आठ अ’चा उतारा हवा असेल, सातबारावर नोंदी घालायच्या असतील, तर वीस हजारांपासून तीस हजारांपर्यंत मागणी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. सत्तेचा वापर ग्रामस्थांच्या पिळवणुकीसाठीच केला जात आहे. सुभाषनगरचे ८ व टाकळीचे फक्त ५ सदस्य असूनही परिसराचा विकास करण्यात सुभाषनगरचे सदस्य अपयशी ठरले आहेत. टाकळी ग्रामपंचायतीस घरपट्टी व अन्य करातून सुभाषनगरातून जादा उत्पन्न मिळते. तरीही सुभाषनगरच्या ग्रामस्थांना टाकळी ग्रामपंचायत नागरी सुविधा देण्यास दुर्लक्ष करीत आहे. सुभाषनगरमध्ये रस्ते नाहीत, डांबरीकरण कधीही करण्यात आले नाही, मात्र कागदोपत्री लाखो रुपये खर्च डांबरीकरणासाठी दाखविण्यात आला आहे. सुभाषनगर येथे ग्रामसभा घेण्याची मागणी करूनही ग्रामसभा घेण्यात आली नाही. टाकळी ग्रामपंचायतीची निष्क्रियता व खाबूगिरीच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. शामराव कुलकर्णी, सुनील जाधव, एस. डी. जोशी, प्रकाश हंकारे, पांडुरंग यमगर, विजय कुंभार, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला लोंढे उपस्थित होते. (वार्ताहर)सुभाषनगर सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्षसुभाषनगरच्या नागरी समस्या जाणून घेण्यासाठी सुभाषनगरला ग्रामसभा घेण्याची मागणी मासिक सभेत केली होती; मात्र या मागणीकडे टाकळीच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सुभाषनगरच्या समस्यांबाबत वारंवार टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार सदस्य सुलेमान मुजावर, शोभा बंडगर, जयश्री माने, बंडू कुलाल, भीमा नंदीवाले, गौरी शिरसाट यांनी केली.
सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा
By admin | Published: December 02, 2014 10:38 PM