संजयनगर : ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हाता-तोंडाला आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भरीव मदतीसह जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदान देण्याच्या मागणीसाठी अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने मंगळवारी जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्याध्यक्ष धर्मेंद्र कोळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके गेली. शेतकऱ्यांना भीषण आर्थिक टंचाईला समोरे जावे लागत आहे. त्यातच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने फसवी आश्वासने देऊन सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले. आता मुक्या जनावरांचेही कंबरडे हे शासन मोडणार काय? अशी भीती जनतेच्या मनात बसली आहे. सरकारने मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनुदान दिले पाहिजे, या मागणीसाठी अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्या जनावरांसह आंदोजन करण्यात आले. शासनाने जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था युध्दपातळीवर केलीच पाहिजे, अन्यथा मंत्रालयासमोर जनावरे बांधून अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, महिला आघाडीच्या आशाताई पवार, तालुकाध्यक्ष हासन मुजावर, असिफ मुलाणी, लक्ष्मी आठवले यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
फोटो : १५ दुपटे ३
ओळ :
सांगलीत मंगळवारी अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
छाया : सुरेंद्र दुपटे