लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात गुंड, गुन्हेगार, तडीपार मोकाट आणि आंदोलनकर्ते तुरुंगात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांची शाबासकी मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांकडून शेतकºयांचे आंदोलन मोडीत काढण्याची सुपारी घेतल्याचा आरोप शेतकरी सुकाणू समितीने बुधवारी पत्रकार बैठकीत केला. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या बदलीसाठी जिल्हाधिकारी व विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे सुकाणू समितीतील महेश खराडे, उमेश देशमुख, विकास मगदूम यांनी सांगितले.ते म्हणाले की, शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत गत आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेले. तेव्हाही मोठा दंगा करून आंदोलकांना मारहाण केली. आताही १४ आॅगस्टरोजी सुकाणू समितीने राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर, आंदोलकांना आदल्यादिवशीच ताब्यात घेण्यात आले. पोलिस आंदोलकांच्या घरांभोवती चकरा मारत होते. आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना अटक करण्याचे षड्यंत्र पोलिसांनी सुरू केले आहे.पोलिसांची दहशत गुंड, गुन्हेगार, तस्करांवर असावी, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºयांवर नव्हे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दिवसाढवळ्या खून होत आहेत. पोलिसच दरोडे टाकत आहेत. ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात कित्येक पोलिस अडकले आहेत. खुद्द पोलिस प्रमुखांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाची झाडे चोरीस गेली आहेत. अशी परिस्थिती असताना, पोलिस मात्र शेतकºयांसाठी कार्य करणाºया आंदोलकांच्या मागे हात धुऊन लागल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री व सत्ताधारी भाजपची शाबासकी मिळविण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.जिल्हा पोलिस प्रमुखांनी बंधारे बांधले, निर्भया पथके तयार केली, त्यांचे निश्चितच कौतुक आहे. पण शेतकरी आंदोलकांवर गुन्हेगारांप्रमाणे होणारी कारवाई कदापीही खपवून घेणार नाही. जिल्ह्यात आंदोलनेच होऊ नयेत असे वाटत असेल, तर मुख्यमंत्र्यांना सांगून सांगली जिल्ह्यापुरती सरसकट कर्जमाफी मिळवून द्यावी, असे आव्हान देत, पोलिस प्रमुखांच्या बदलीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन देणार आहे, असेही ते म्हणाले.पाठलाग करून अटकमहेश खराडे म्हणाले की, चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी माझ्यासह उमेश देशमुख, विकास मगदूम व इतरांच्या घरावर पाळत ठेवली होती. आंदोलनापूर्वीच अटक होण्याची कुणकुण लागताच मी शंभरफुटी रस्त्यावरील मित्राच्या फ्लॅटमध्ये रात्रभर थांबून होतो. रात्री मी मोबाईलही बंद केला होता. सकाळी देशमुख यांच्याशी संपर्कासाठी मोबाईल सुरू केला. त्याच्या लोकेशनवरून पोलिसांनी माझ्या अटकेसाठी बंदोबस्त पाठविला. पोलिसांना चुकवून मी दुसºया रस्त्याने निघून गेलो, तर पोलिसांनी माझा चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून अटक केली.
मुख्यमंत्र्यांच्या शाबासकीसाठी आंदोलन मोडण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:47 PM