इस्लामपूर/कासेगाव : भांडवलशाहीचा पूर्ण पराभव केल्याशिवाय कोरोनानंतरचे समृद्ध जग जन्माला येऊ शकत नाही. त्यासाठी वर्गीय, जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत करणारी चळवळ संघटित करावी लागेल. श्रमिक मुक्ती दलाने विकसित केलेली भूमिका हीच निरोगी आणि समृद्ध विकासासाठी उपयुक्त ठरू शकते. हे सत्य कोरोनाच्या काळात स्पष्ट झालेले आहे, असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
कासेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर बाबूजी पाटणकर प्रबोधन संस्थेच्या सभागृहात आयोजित श्रमिक मुक्ती दलाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. श्रमुदचे कार्याध्यक्ष संपत देसाई, मोहनराव यादव, डॉ. प्रशांत पन्हाळकर, ॲड. कृष्णा पाटील, जयंत निकम, मोहन अनपट, चैतन्य दळवी, अंकुश शेडगे, मारुती पाटील, शरद जांभळे, दिलीप पाटील, सुधीर नलवडे, डी.के. बोडके उपस्थित होते.
श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याला अभिवादन करून क्रांतिकारक गीताने अधिवेशनाला सुरुवात झाली. संतोष गोटल यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. डॉ. पाटणकर म्हणाले, गेल्या ४० वर्षांपासून श्रमिक मुक्ती दलाने कष्टकऱ्यांच्या अनेक चळवळी केल्या. नवा शोषणमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर वर्ग, जात आणि लैंगिक शोषणाच्या पायावर उभी राहिलेली तसेच निसर्गाला उद्ध्वस्त करणारी प्रदूषणकारी व्यवस्था मोडून नवी व्यवस्था आणावी लागेल. त्यासाठी शेती आणि शेतीवर आधारलेले नवे कृषी औद्योगिक धोरण घ्यावे लागेल. पर्यावरण संतुलित समृद्ध समाज निर्माण करण्याची ताकद या धोरणात आहे. नव्या तंत्रविज्ञानाआधारे आजच्या भांडवली उत्पादन व्यवस्थेचा पराभव करून समतेवर आधारलेली नवीन उत्पादन व्यवस्था आणता येते हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. कोरोना महामारीने ते अधिक स्पष्ट केले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रमुख आंदोलने, चळवळी आणि उपक्रम, दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि माध्यमांची भूमिका, स्त्रियांचे अधिकार आणि वाढते शोषण, लॉकडाऊननंतर चळवळीत आलेला विस्कळीतपणा आणि चळवळींच्या आंदोलनाला शासनाकडून मिळालेला प्रतिसाद अशा विषयांवर चर्चा झाली.
मोहनराव यादव म्हणाले, शासन आणि प्रशासनावर दबाव ठेवण्यासाठी चळवळी सक्रिय हव्यात. चळवळीचे अस्तित्व संघर्षाच्या आधारावर टिकून राहते. त्यामुळे संघर्षात सातत्य हवे. ॲड. कृष्णा पाटील म्हणाले, श्रमुदच्या ऑनलाइन व्याख्यानमालेला जगभरातून प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या अंधकारमय काळात उद्भवणाऱ्या प्रश्नांना श्रमुदने वाचा फोडली. संकटात न भिता स्थितप्रज्ञ राहण्याचा कृतिशील विचार दिला. कोरोनाच्या ताणतणावात सावरण्याची शक्ती दिली. आंदोलन, उपोषण, धरणे या पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे जाण्याचा विचार श्रमुदने गांभीर्याने केला आहे. संपत देसाई यांनी प्रास्ताविकात कोरोनापूर्वीचे आणि नंतरचे जग हा अधिवेशनाचा मुख्य विषय असल्याचे सांगून येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत निरोगी आणि समृद्ध समाजनिर्मितीचा विचार श्रमुदने दिल्याचे स्पष्ट केले.
फोटो : २३ इस्लामपुर १
कासेगाव (ता. वाळवा) येथे श्रमिक मुक्ती दलाच्या राज्य अधिवेशनात डॉ. भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी माेहन यादव, संपत देसाई उपस्थित हाेेते.