सांगली : ग्रामीण भागातील दूध संकलन केंद्र चालक क्रिप्स तेल, युरिया, निरमा, लाकटोस पावडर, निरमा यासारखे विषारी पदार्थ मिसळून लहान मुलांच्या जिवाशी खेळ चालू आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन देऊनही त्यांच्याकडून कारवाई होत नाही. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून जिल्ह्यातील दूध भेसळ थांबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश साळुंखे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिलेल्या निवेदन दिले आहे. त्यानंतर ऋषिकेश साळुंखे म्हणाले की, दुधाची फॅट वाढविण्यासाठी क्रिप्स तेल, कॉस्टिक सोडा, मलटो स्वारबीट ऑईल, युरिया, कार्बन, निरमा यासारख्या विषारी पदार्थांची दुधात भेसळ केली जात आहे. क्रिप्स तेल विक्रीस बंद असतानाही सांगली मार्केट यार्डातील काही दुकानदार चोरून विक्री करीत आहेत. दूध भेसळीमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी करूनही कारवाई झाली नाही. नागरिकांच्या आरोग्यास घातक दूध भेसळीवर प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
चौकट -
दूध संकलन केंद्र चालकांबरोबर आर्थिक तडजोड
आटपाडी तालुक्यातील एका गावामध्ये दूध भेसळीचा प्रकार झाला होता. याबाबत एका अधिकाऱ्यांनी सहा लाखांची तडजोड करून त्या दूध संकलन केंद्र चालकास सोडून दिले आहे. तसेच संबंधित दूध संकलन केंद्र चालकाने संकलनच बंद ठेवल्यामुळे वादावर पडदा पडल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. या दूध भेसळीच्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही साळुंखे यांनी केली आहे.