अविनाश कोळी ।सांगली : जनजागृती, शिबिरांची वाढती संख्या, संघटनात्मक चळवळीला मिळणारे बळ यामुळे गेल्या काही वर्षांत सांगली जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. त्यातही आता दुर्मिळ रक्तदात्यांकडून दिले जाणारे योगदान ठळकपणे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून त्यांचे दातृत्व विस्तारत आहे.
राज्याचा रक्तदात्यांचा आलेख ज्यापद्धतीने वाढत आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील रक्तदात्यांची संख्याही वाढताना दिसते. मागणीच्या तुलनेत आजही शंभर टक्के ऐच्छिक रक्तदान होत नसले तरी, भविष्यात हा आकडा गाठणे कठीण नसल्याचेही आशादायी चित्र दिसून येते. साधारण रक्तदानाच्या चळवळीसोबतच दुर्मिळ रक्तगटासाठी विशेष मोहिमा राबविणाऱ्या संघटनांचा जन्म गेल्या काही वर्षांत झाला. यामध्ये आयुष ब्लड हेल्पलाईन, बॉम्बे ओ ग्रुप यासारख्या आणखी काही संघटनांचा समावेश आहे. आयुष या संस्थेकडे ९५०० दात्यांचा मोठा गट आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ३५०० रुग्णांना निगेटिव्ह रक्ताचा, दीड हजार रुग्णांना प्लेटलेटस्चा आणि १७५ रुग्णांना एसडीपी (सिंगल डोनर प्लेटलेटस्)चा पुरवठा केला आहे. त्यांची चळवळ सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यांपर्यंत वाढली आहे.
बॉम्बे ओ या दुर्मिळ रक्तगटाचे जिल्ह्यात केवळ चौघेच आहेत. या चारही लोकांनी अनेकजणांना जीवदान दिले आहे. संपूर्ण महाराष्टÑात त्यांनी १५ हजार ७३० धडपड्या रक्तदात्यांची एकत्रित बांधणी केली. राज्यासह दिल्ली, हरियाणा, ओडिशा व अन्य राज्यात जेथे या दुर्मिळ रक्ताची गरज भासेल, त्याठिकाणी ते रक्त विनामूल्य पोहोचविण्याचे काम विक्रम यादव व त्यांची टीम करीत आहे. या दोन्ही संघटनांसह आजही जिल्ह्यात अनेक संस्था, संघटना रक्तदात्यांची ही चळवळ बळकट करण्याचे काम तितक्याच जोमाने आणि आत्मियतेने करताना दिसत आहेत.शासनाच्या उदासीनतेचा फटका!आयुष संस्थेचे प्रमुख अमोल पाटील म्हणाले की, रक्तदात्यांचे प्रमाण वाढत असतानाच शासनाच्या उदासीनतेचा फटका या चळवळीला बसताना दिसत आहे. आजही रक्तदात्यांकडून मोफत मिळणारे रक्त त्यावरील प्रक्रिया, महागड्या बॅग्ज यामुळे रुग्णापर्यंत जाईपर्यंत महागडे होते. एसडीपीचा केलेला पुरवठा रुग्णापर्यंत जाईपर्यंत ११ ते १२ हजार ५०० रुपयांपर्यंत महागडा होतो. याचे कारण म्हणजे रक्तावरील प्रक्रिया आणि विशेषत: त्यासाठी वापरल्या जाणाºया बॅग्जच्या किमती. होल ब्लड, प्लेटलेटस्, क्रायो, एफएफपी यासारखे रक्तघटकसुद्धा अशाच प्रक्रियेतून जातात. शासनाने चळवळीचाच एक भाग म्हणून जर यासाठी अनुदान दिले तर, अत्यंत कमी किमतीत हे रक्त गरीब रुग्णांपर्यंत पोहोचविता येऊ शकेल.तुटवड्याचा काळ संपणार कधी?राज्याच्या ऐच्छिक रक्तदात्यांचा आलेख पाहिला तर, १९९६ मध्ये ३८ टक्के इतके प्रमाण होते. २०१६ पर्यंत रक्तदात्यांचा मागणीच्या तुलनेतील पुरवठा ९७.०६ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील काही रक्तपेढी चालकांशी केलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात हेच प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांच्या घरात असेल. रक्ताचा सर्वात मोठा तुटवडा मार्च ते जून या महिन्यांमध्ये जाणवतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षा व सुटीचा कालावधी असल्याने या कालावधित रक्तपुरवठ्याचे प्रमाण घटते. संघटनात्मक पातळीवर आता या कालावधित शिबिर घेणे गरजेचे आहे.
रक्त व रक्तघटकांचे संक्रमण हजारो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी मदत करते. त्यामुळे रक्तदानाची ही चळवळ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. रक्तदान केल्याने रुग्णांबरोबरच दात्याच्या आरोग्यालाही तितकेच फायदे मिळत असतात. सांगली जिल्ह्यात ही चळवळ वाढताना दिसत आहे.- डॉ. प्रणिता गायकवाडरक्त संक्रमण अधिकारी, शासकीय रुग्णालय, सांगली