सांगली : येथील मार्केट यार्डात सुरू असलेला बेदाणा सौदे सावळी (ता. मिरज) येथील जागेत हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह व्यापाऱ्यांनी विरोध केला असून, त्याबाबत बाजार समितीकडे लेखी तक्रार केली आहे.सौदा हलविण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला असून, संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खोलकुंबे, सुरेश बसुगडे यांनी बाजार समितीचे सहायक सचिव नितीन कोळसे यांनी निवेदन दिले. बाजार समितीच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेदाणा सौदा काढला जातो. शेतकरी आणि खरेदीदारांसाठी सोयीची आणि सुरक्षित जागा आहे. याशिवाय इतर सोयीसुविधा असल्याने मोठ्या प्रमाणात बेदाण्याची आवक सुरू आहे. प्रत्येक सौद्यावेळी किमान २०० पेक्षा अधिक गाड्या बेदाणा आवक आहे. काही व्यापाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी बाजार समितीच्या सावळी येथील खुल्या जागेत हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप संजय खोलकुंबे यांनी केला आहे. बाजार समितीने चार-पाच वर्षांपूर्वी सावळी येथे सुमारे १४ एकर जागा खरेदी आहे. मात्र सध्या चांगले रस्ते, कोणत्याही सुविधा नाहीत. सौदे हलविण्यास काही व्यापाऱ्यांचा विरोधही आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली मार्केट यार्डातील बेदाणा सौदे सावळीला हलविण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही खोलकुंबे यांनी दिला आहे.यावेळी शैलेश गारे, विजय खोलकुंबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुकाध्यक्ष सुरेश वसगडे, शिरशेल सलगरे, दीपक कनवाडे, बाळासाहेब भानुसे आदी उपस्थित होते.
शेतकरी-व्यापाऱ्यांना सुविधा देणार : सुजय शिंदेमार्केट यार्डात बेदाण्याची आवक वाढली असून, जागा अपुरी पडत आहे. सावळी येथे मोठी जागा आहे. या जागेवर बेदाण्याचे स्वतंत्र मार्केट उभे करण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे. सध्या बाजार समितीकडे आर्थिक तरतूद नसल्याने व्यापाऱ्यांना पैसे घालण्यास सुचविले आहे. व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन चांगले शेड उभे करणार आहोत. याशिवाय त्या ठिकाणी मूलभूत सर्व सुविधा देणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली.