अर्जुन कर्पे
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात बेरजेचे राजकारण करताना खासदार संजयकाका पाटील यांनी नेत्यांना आपल्या गटात घेतले होते. आता तेच खासदारांना सोडून गेले आहेत. यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आता ना निष्ठावंत जवळ; ना सांभाळलेले जवळ, अशी अवस्था कवठेमहांकाळ तालुक्यात संजयकाका गटाची झाली आहे.
नुकताच अंजनी येथे राष्ट्रवादीत कवठेमहांकाळ तालुक्यातील काका गटाचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर यांनी प्रवेश केला. खासदार पाटील यांनी कोळेकर यांना त्यांच्या गटात आल्यावर गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासनिधी दिला. यासोबत बाजार समितीचे स्वीकृत सदस्य म्हणूनही कोळेकर यांना संधी दिली. नंतर कोळेकर यांनी बाजार समितीमधील काही जणांना हाताशी धरत शेतकऱ्यांच्या ४० कोटींच्या ठेवी, बाजार समितीच्या आवारातील जागा आणि काही दुकान गाळ्यांमध्ये गैरव्यवहार केला आहे; अशी तक्रार बाजार समितीच्या संचालकांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केल्या आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात खासदार पाटील यांना राजकीय बळ देण्याचे काम बंटी भोसले, उदय भोसले, श्रीनिवास नाईक, तुकाराम पाटील, मिलिंद कोरे, अनिल लोंढे, दयानंद सगरे, विकास भोसले यांनी केले. परंतु त्यांनतर खासदार गटात दादासाहेब कोळेकर, चंद्रकांत हाक्के, अनिल शिंदे यांनी प्रवेश केला आणि निष्ठावंतविरुद्ध आयात कार्यकर्ते असा छुपा संघर्ष उभा राहिला. कोळेकर खासदार पाटील यांचे सारथी झाले. त्यांच्या तालुक्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे काकांचे निष्ठावंत त्यांच्यापासून दुरावले. याचा फटकाही तालुक्याच्या राजकारणात काकांना बसला आहे.
...हाती धुपाटणे आले
दादासाहेब कोळेकर आणि काका गटाच्या इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये केलेला प्रवेश निष्ठवंतांच्या जिव्हारी लागला आहे. या आयात कार्यकर्त्यांमुळे काकांचे निष्ठावंत दूर झाले आणि दलबदलू कार्यकर्ते सवयीप्रमाणे गायब. यामुळे तेल ही गेले, तूप ही गेले हातात धुपाटणे आले अशी म्हणण्याची वेळ खासदार गटावर आली आहे.