सांगली : ज्या ‘पायलट’नी खासदार विशाल पाटील यांचे विमान दिल्लीत लँड केले, त्या पायलटना म्हणजेच आमदार विश्वजित कदम यांना ‘मुख्यमंत्रिपदाचा चेहरा’ असे वारंवार सांगून त्यांना बाद करण्याची योजना खासदार पाटील यांनी आखली नाही ना? असा सवाल उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी येथे केला.खासदार विशाल पाटील यांनी नुकतेच उद्धवसेनेचे नेते प्रसिद्धीसाठी टीका करतात, असे विधान केले होते. यावर उत्तर देताना विभुते म्हणाले, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी म्हणून पाठिंबा दिला आहे. असे असताना महायुतीतील भाजपशी निगडित शिंदेसेनेच्या सुहास बाबर यांना ऑफर देऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. त्यांना निवडून दिलेल्या मतदारांच्या मताचा हा अनादर नाही काय? याचे उत्तर त्यांनी द्यावे. आमदार विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे वारंवार सांगून त्यांना टार्गेटवर ठेवण्याचे काम विशाल पाटील करत आहेत. एकीकडे जयंत पाटील यांना टार्गेट करून विश्वजित यांना बाद करण्याची त्यांची योजना नाही ना? अशी शंका येते.ते पुढे म्हणाले, विशाल पाटील यांनी सुहास बाबर यांना ऑफर दिल्यानंतर त्यांनी तो प्रस्ताव ठोकरला आहे. त्यामुळे विशाल यांनी आघाडीचे घटक म्हणून भूमिका काय असणार? ते स्पष्ट करावे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही सांगली आणि मिरजेवर दावा करणार आहोत. जयश्री पाटील यांना काँग्रेसमधून तिकीट मिळणार नाही, असे दिसते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर निवडून आणू.
'विशाल पाटील यांच्याकडून ‘विश्वजित’ विरोधात खेळी, आघाडी म्हणून भूमिका मांडा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 5:15 PM