Sangli Politics: विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर खासदार विशाल पाटील धर्मसंकटात, भूमिकेची उत्सुकता 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 07:16 PM2024-09-09T19:16:33+5:302024-09-09T19:17:05+5:30

लोकसभेचा पैरा फेडताना होणार कसरत

MP Vishal Patil faces many difficulties in the upcoming assembly elections | Sangli Politics: विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर खासदार विशाल पाटील धर्मसंकटात, भूमिकेची उत्सुकता 

Sangli Politics: विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर खासदार विशाल पाटील धर्मसंकटात, भूमिकेची उत्सुकता 

दत्ता पाटील

तासगाव : लोकसभा निवडणुकीत अपक्ष रिंगणात असूनही सर्वपक्षीय नेत्यांनी पाठबळ देऊन विशाल पाटील यांना लोकसभेत पाठवले. मात्र, आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लोकसभेला केलेला पैरा फेडावा, अशी अपेक्षा इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. बहुतांश मतदारसंघात अनेक इच्छुक आणि सर्वच इच्छुक लोकसभेला खासदार पाटील यांच्यासोबत असणारेच आहेत. त्यामुळे विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर विशाल पाटील धर्मसंकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून ते बाहेर कसे पडणार? याचे औत्सुक्य आहे.

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभा राहून निवडून येण्याची किमया विशाल पाटील यांनी साधली. विशाल पाटील यांना विजयापर्यंत नेण्यासाठी आमदार विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीही रसद पुरवली. त्यामुळेच मतदारसंघातील वारे फिरले आणि विशाल पाटील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली.

लोकसभेला विशाल पाटलांच्या विजयामुळे त्यांना पाठबळ देणाऱ्या सर्वच नेत्यांचा विधानसभा निवडणुकीसाठी आत्मविश्वास उंचावला आहे. यापैकी बहुतांश नेत्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पलूस-कडेगावचा अपवाद सोडल्यास, अन्य पाच विधानसभा मतदारसंघांत विशाल पाटील यांच्यासमाेर धर्मसंकट निर्माण झाले आहे.

सर्वच इच्छुकांनी खासदारांकडे पैरा फेडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आताच्या विधानसभेत घेतलेला निर्णय दुरगामी ठरणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे अद्याप तरी विशाल पाटील यांची भूमिका ‘नरो वा कुंजरो वा’ अशीच आहे. मात्र, येणाऱ्या काळात ते कोणाचा पैरा फेडणार आणि या धर्म संकटातून कसे बाहेर पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

खासदारांसमोरील धर्मसंकट

सांगली विधानसभा - होम ग्राउंड असलेल्या सांगली विधानसभा मतदारसंघात जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील दोघेही इच्छुक आहेत. विधानसभा उमेदवारीवरून दोन्ही इच्छुकांत संघर्ष सुरू आहे. धर्म संकटाची सुरुवात होम ग्राउंडवरच झाली आहे.

मिरज विधानसभा - गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे होता. हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यासाठी विशाल पाटील प्रयत्नशील आहेत. मात्र, इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कोणाच्या तराजूत वजन टाकायचे, हे ठरवतानाच त्यांची कसरत होणार आहे.

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा - या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. आता माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही रणशिंग फुंकले आहे. या दोन्ही नेत्यांनी लोकसभेला विशाल पाटील यांना रसद दिली होती.

खानापूर - आटपाडी विधानसभा - या मतदारसंघात विशाल पाटील यांना शिवसेना शिंदे गटाची काही ठिकाणी छुपे सहकार्य, तर तानाजीराव पाटील यांचे उघड पाठबळ मिळाले होते. येथे शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर रिंगणात आहेत. मात्र, विशाल पाटील महाआघाडीत, तर बाबर महायुतीत असल्यामुळे धर्मसंकट निर्माण होणार आहे.

जत विधानसभा - या मतदारसंघात विशाल पाटील यांचा कौल काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या बाजूनेच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी देत विशाल पाटील यांची खिंड लढवणारे विलासराव जगताप विधानसभेला सावंत यांच्या विरोधात उतरले, तर मात्र खासदार पाटील यांची कसरत होणार आहे.

Web Title: MP Vishal Patil faces many difficulties in the upcoming assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.