‘तडजोडी’च्या राजकारणाला तडा देणारे विशाल पाटील पुन्हा त्याच मार्गावर ?; सांगली, मिरजेतील भूमिकांकडे लक्ष
By हणमंत पाटील | Published: August 26, 2024 04:30 PM2024-08-26T16:30:09+5:302024-08-26T16:33:37+5:30
खानापूरच्या भूमिकेवरून यु-टर्न..
हणमंत पाटील
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील परंपरागत तडजोडीच्या (सेटलमेंट) राजकारणाला खासदार विशाल पाटील यांच्या बंडखोरीने तडा गेला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणात परिवर्तनाची लाट येण्याची आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती; मात्र विशाल पाटील यांनी खानापूर मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे गटातील इच्छुक सुहास बाबर यांच्याविषयी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर विशाल पाटील पुन्हा पूर्वीच्या तडजोडीच्या राजकारणाच्या मार्गावरून जाणार की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी दिल्ली, मुंबई व नागपूर दौरे करूनही विशाल पाटील यांना तिकीट मिळाले नाही. जिल्ह्यात उद्धवसेनेची ताकद नसतानाही दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून तडजोडीचे राजकारण करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांचा डाव यशस्वी झाला. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. अन् गेल्या अनेक वर्षांपासून सुप्तावस्थेत असलेला काँग्रेसचा कार्यकर्ता जागा होऊन पेटून उठला. सांगली शहरातील हे लोण हळूहळू जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचले.
विशाल पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या भूमिकेने त्यांची उमेदवारी केवळ काँग्रेसची राहिली नाही. तर सर्व राजकीय पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ज्या खानापूर-आटपाडी तालुक्यातून काँग्रेसची तीन लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झाली त्या तालुक्यातूनही विशाल पाटील यांना १७ हजारांचे मताधिक्य मिळाले. नेते व पक्ष बाजूला ठेवून येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बंडखोरीला पाठिंबा दिला. त्यामुळे विशाल पाटील यांचे पाकीट हे नवखे चिन्ह असूनही कमी कालावधीत गावागावातील मतदारांपर्यंत पोहोचविले.
लोकसभेला एक लाखाच्या मताधिक्याने निवडूनही आणले. त्यामुळे काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्याविषयी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे पुढे विशाल यांना प्रत्येक पाऊल हे सावधानतेने टाकावे लागणार आहे. जो संयम त्यांनी निवडणुकीत दाखविला, तोच पुढील पाच वर्षांत दाखविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
खानापूरच्या भूमिकेवरून यु-टर्न..
खानापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व महायुतीतील काही नेते व कार्यकर्त्यांनी उघड नाही, पण छुपा पाठिंबा विशाल पाटील यांना लोकसभेवेळी दिला. ते खानापूर-आटपाडी तालुक्यातील मताधिक्याने दिसून आले. हा पेरा फेडण्यासाठी विशाल पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. त्यावर उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी टीका केल्यानंतर त्यांनी या विधानावरुन ‘यू-टर्न’ घेतला.
मिरज, सांगलीत गटबाजी रोखण्याचे आव्हान?
खानापूर विधानसभेसाठी महायुतीतील उमेदवाराच्या पाठिंब्याची जाहीर भूमिका घेणारे विशाल पाटील हे सांगली व मिरज विधानसभेसाठी भूमिका का घेत नाहीत ? असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील इच्छुक आहेत. दोन्ही इच्छुकांनी बैठका, मोर्चे व पोस्टरबाजीत वेगळी चूल मांडलेली दिसते. जयश्री पाटील यांनी तर काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे. हीच परिस्थिती मिरज विधानसभेत आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी वाढू द्यायची की त्यातून मार्ग काढायचा ? यासाठी विशाल पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.