सांगली : एमपीएससी परीक्षा तारखांच्या घोळामुळे विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. ही परीक्षा रविवारी (दि. २१) होणार असून याच दिवशी रेल्वेचीही परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याने त्यापैकी एखाद्या परीक्षेकडे पाठ फिरविण्याची वेळ आली आहे.
एमपीएससीच्या १४ मार्चच्या परीक्षेत घोळ झाला. ऐनवेळी परीक्षाा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये प्रक्षोभ निर्माण झाल्याने तातडीने हालचाली करत रविवारी (दि. २१) परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले, पण यादिवशी रेल्वेचीही परीक्षा असल्याकडे आयोगाचे व शासनाचे दुर्लक्ष झाले. या घोळामुळे विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.
बहुतांश विद्यार्थी या दोन्ही परीक्षांची तयारी करत आहेत. दोन्ही एकाच दिवशी येण्याने त्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या अनागोंदीमुळे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
चौकट
रेल्वेची परीक्षा होणार ऑनलाइन
गेल्या मार्चपासून रेल्वेच्या वेगवेगळ्या पदांच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा ऑनलाइन असल्याने विद्यार्थी घरातूनच त्या देत आहेत. एकूण ३२ हजार २०८ जागांसाठी ही परीक्षा अगोदरच जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यासही केला होता. आता एमपीएससीसाठी रेल्वेच्या परीक्षेकडे पाठ फिरवावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थी नाराज आहेत.
चौकट
प्रसंगी पीपीई किट घालावे लागेल
एमपीएससी परीक्षेसाठी महापालिका क्षेत्रात २७ परीक्षा केंद्रे आहेत. त्यामुळे फारशी धावपळ होणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र केंद्रावर पोहोचण्यासाठी खटाटोप करावा लागणार आहे. तेथून पूर्ण क्षमतेने एसटी अद्याप सुरू झालेल्या नाहीत. कोरोनामुळे बरीच काळजी घ्यावी लागणार आहे. एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित असल्यास त्याला पीपीई किट घालून परीक्षा द्यावी लागेल.
पॉईंटर्स
एमपीएससीसाठी पराक्षार्थी - ९५००
परीक्षा केंद्रे - २७
कोट
एमपीएससीने ऐनवेळी रविवारचा (दि. २१) दिवस निवडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना यातील एक परीक्षा सोडावी लागेल. प्रशासकीय अनागोंदीमुळे विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
- स्वप्निल अवताडे, परीक्षार्थी
कोट
रेल्वेच्या परीक्षा गेल्या मार्चपासून सातत्याने सुरू आहेत. त्यापैकी एखादी राहिल्याने फार मोठे नुकसान होणार नाही. एमपीएससीची परीक्षा वरचेवर होत नसल्याने त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये होणाऱ्या कंबाईन परीक्षेचीही तयारी करणार आहे.
- मयूर साने, परीक्षार्थी
कोट
रेल्वेने परीक्षेची तारीख अगोदरच जाहीर केली होती, याचा विचार राज्य परीक्षा आयोगाने करायला हवा होता. आयोगाने यापूर्वीही अनेकदा असे घोळ घातलेत. दुसऱ्या परीक्षा असतानाही आपल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. या प्रकाराने तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित राहावे लागण्याची भीती आहे.
- शरद सरगर, परीक्षार्थी