सांगली : राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा आज, रविवारी होत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आवश्यक त्या खबरदारी घेऊन परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील २७ केंद्रांवर ८ हजार ९३२ जण परीक्षा देणार आहेत. प्रशासनाच्यावतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा केंद्रावर २७ उपकेंद्र असून त्यात ८ हजार ९३२ जण परीक्षा देणार आहेत. प्रशासनाकडून २७ उपकेंद्रप्रमुख, १२४ पर्यवेक्षक, ४३२
समवेक्षक, ६० मतदनीस लिपिक, ५४ शिपाई कर्मचारी व ३६ वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली
आहे. उपजिल्हाधिकारी दर्जाचे ७ समन्वय अधिकारी व दोन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेसाठी कार्यरत प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
परीक्षा देणाऱ्या तरुणांना मास्क, हातमोजे व सॅनिटायझर पुरविण्यात येणार आहे, परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना ताप, सर्दी, थंडी अशी कोरानासदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांना पीपीई किट देण्यात येणार आहे. प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली असून उमेदवारांनी प्रवेश पत्रासह आपल्या केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.