खटाव येथे परीट वस्तीचा वीजपुरवठा बंद असल्याने श्रीशैल शिंगाडे हे विद्युतपुरवठा सुरू करण्यासाठी विद्युत खांबावर चढले होते. लिंगनूर उपकेंद्रातून विद्युतपुरवठा सुरूच असल्याने वायरमन श्रीशैल शिंगाडे यांचा विजेचा जाेरदार धक्का बसून खांबावरच मृत्यू झाला.
उच्चदाबाच्या विद्युत धक्क्याने श्रीशैलचा एक हात मनगटापासून तुटून खाली पडला. मृतदेह लटकत असतानाही लिंगनूर उपकेंद्रातून अर्धा तास वीजपुरवठा सुरूच होता. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे श्रीशैल शिंगाडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत खटाव ग्रामस्थांनी या घटनेस जबाबदार महावितरण अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. मृताच्या कुटुंबीयांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेह खांबावरून काढू देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तब्बल सहा तास मृतदेह खांबावरच लटकत होता.
महावितरण अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घातल्याने मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश विरकर, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड व दंगल नियंत्रण पथकासह घटनास्थळी आले. पोलीस व महावितरण अधिकारी व ठेकेदाराने मृत श्रीशैल यांच्या कुटुंबियांना सात लाख रुपये भरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री ११ वाजता मृतदेह खांबावरुन काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.