सांगली : शेतकऱ्यांना अधिक चांगल्या वीजपुरवठ्यासाठी शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण जाहीर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणद्वारे १ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान कृषी ऊर्जा पर्व राबविले जाणार आहे.शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी, दिवसा ८ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, थकबाकीत सूट, कृषी वीजपुरवठ्यामध्ये ग्रामपंचायती व साखर कारखान्यांचा सहभाग, पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सोमवारी (दि. १) होईल. या मोहिमेअंतर्गत तालुका स्तरावर व मोठ्या गावांमध्ये कृषी वीज ग्राहक मेळावे आयोजित केले जाणार आहेत. माझे वीजबिल, माझी जबाबदारी मोहिम सुरु केली जाणार आहे.
थकबाकीमुक्त ग्राहकांचा सत्कार, नवीन कृषी ग्राहकांना वीजजोडणी मंजुरीचे कोटेशन, वीजजोडणी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदांच्या समन्वयाने ग्रामसभा घेऊन कृषी वीज धोरणाची माहिती दिली जाणार आहे.महिला दिनाचे औचित्य साधून थकबाकी भरणाऱ्या महिलांचा ८ मार्चला सत्कार, महिलांच्या नावे वीजजोडणीस प्राधान्य, थकबाकी वसुली करणाऱ्या महिला सरपंचांचा तसेच महिला जनमित्रांचा व ऊर्जामित्रांचा सत्कार केला जाणार आहे.
महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागातून अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रबोधन केले जाणार आहे. होर्डिंग, पोस्टर, बॅनर, बस थांब्यांवर जिंगल, गावात दवंडीद्वारे मोहिम सामान्यांपर्यंत पोहोचविली जाईल.ग्राहक संपर्क अभियानात थकबाकीदार शेतकर्यांना एसएमएस व सोशल मीडियाद्वारे माहिती दिली जाईल. शेतकर्यांच्या वीजबिलविषयक तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरणजिल्हा, तालुका, गाव पातळीवर सायकल रॅली, शासकीय कर्मचाऱ्यांचे तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण, एक दिवस देश रक्षकांना, थकबाकीमुक्त गावांचा व शेतकऱ्यांचा सन्मान, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, वीज सुरक्षा व कॅपॅसिटरचे महत्त्व, शेतकऱ्यांचा पैसा त्यांच्याच सुविधांसाठी, वासुदेव, पथनाट्ये, दूरचित्रवाणी व रेडिओ मुलाखती आदी उपक्रमांसह दिड महिना मोहिम चालेल. त्याद्वारे शेतकर्यांना बिल भरण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.