टेंभू सिंचन योजनेच्या पाण्याचा कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुक्यांना लाभ होत आहे. येथील शेतकरी त्यांच्या हिश्श्याची विद्युत बिलासह पाणीपट्टीची रक्कम नियमित भरत आहे. परंतु, सांगली पाटबंधारे मंडळाच्या हिश्श्याचे पैसे भरण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाकडून निधी आला नसल्यामुळे ९ कोटी ५० लाखांची थकबाकी राहिली आहे. या थकबाकीमध्ये दंड आणि व्याजाची रक्कम महावितरण कंपनीने लावलेली नाही. ताकारी योजनेचेही १८ कोटी, तर म्हैसाळ योजनेची सर्वाधिक ४० कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी सांगली पाटबंधारे मंडळाकडे निधीची उपलब्ध नाही. पाटबंधारे मंडळाचे अधिकारी म्हणतात की, दुष्काळात योजना चालू ठेवल्यामुळे टंचाई निधीतून वीज बिलाची रक्कम भरावी. परंतु, टंचाईतून पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. यामुळे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. महावितरण कंपनीला काही तर रक्कम भरल्याशिवाय सिंचन योजना चालू करता येणार नाही. पाटबंधारे विभागाकडून महावितरणची थकबाकी भरण्यासाठी कृष्णा खोरे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही टंचाई निधीतून निधीची मागणी केली आहे.
चौकट
टंचाईतून केवळ १६.५० कोटी
सिंचन योजनांची थकबाकी भरण्यासाठी टंचाईतून सांगली पाटबंधारे मंडळाला १६ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. येत्या आठवड्यात टंचाईचा निधी मिळाल्यानंतर महावितरणची थकबाकी भरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्राधान्याने कोणती योजना चालू करायची, याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी निर्णय घेणार आहेत.
चौकट
सिंचन योजनांचे थकीत वीजबिल
सिंचन योजना थकीत रक्कम
टेंभू ९.५० कोटी
ताकारी १८ कोटी
म्हैसाळ ४० कोटी
एकूण ६७.५० कोटी