दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे सध्या महावितरणकडून सक्तीने थकीत वीजबिलाची रक्कम वसूल केली जात आहे. सक्तीची वसुली तत्काळ थांबवून ग्राहकांना हप्ते बंधून द्यावेत. अन्यथा अन्यायकारक वसुलीबाबत गुरुवार दि. १८ मार्च रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच अमोल मोरे यांनी निवेदनाद्वारे महावितरणला दिला आहे.
वीजबिल भरण्यासाठी नागरिकांचा विरोध नाही. कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती कोलमडली असून, एकाचवेळी थकीत बिलाची पूर्ण रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांना हप्ते बांधून द्यावेत. अजूनही दिघंचीतील व्यापार पेठ पूर्वपदावर आली नाही. अवकाळी व नुकसान ग्रस्त झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आम्हीही वीज कंपनीला ग्रामपंचायतमार्फत प्रबोधन करून वीजबिल वसुलीसाठी सहकार्य करू, परंतु महावितरणकडून होत असलेली सक्तीची वसुली तत्काळ थांबवून हप्ते बांधून द्यावेत, अशी मागणी सरपंच मोरे यांनी केली आहे.