लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे महावितरण कंपनीचे सुमारे दहा काेटींचे नुकसान झाले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी जिवाची पर्वा न करता महापुरातही जाऊन वीजपुरवठा सुरळीत केला.
शिराळा तालुक्यात वारणा व मोरणा नदी, त्याचबरोबर ओढ्यांना गत आठवड्यात महापूर आला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामध्ये लघुदाब वाहिनीचे ६०० खांब, उच्चदाब वाहिनीचे ४०० खांब पडले. २०० डीपी, तसेच पणुंब्रे येथील सबस्टेशन पाण्यात गेले होते. अनेक ठिकाणी तारा तुटल्या. यामध्ये महावितरणचे सुमारे दहा काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे. उपअभियंता प्रल्हाद बुचडे, रुपेश कोरे, स्वप्नजा गोंदिल, अमोल भेडसगावकर, महेंद्र रसाळ, कैलास जगताप, के. जी. देसाई यांच्यासह कर्मचारी, ठेकेदार यांनी अहाेरात्र कष्ट घेऊन वीजपुरवठा सुरळीत केला.
पणुंब्रे येथील अमोल भेडसगावकर व कर्मचाऱ्यांनी महापुरातही पोहत जाऊन मांगले येथील वीजपुरवठा सुरळीत केला. मांगले येथील स्वप्नजा गोंदील यांनीही आदर्श काम केले.
चौकट
पडलेले खांब, तारांना स्पर्श करू नये
तालुक्यात येत्या पंधरवड्यात आणखी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी ओली अथवा वाळलेली कपडे तारांवर टाकू नयेत, विद्युत खांब, पडलेल्या तारांना स्पर्श करू नये. घरातील सर्व विद्युत यंत्रणेची दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांनी केले आहे.