मिरजेतील छत्रपती शिवाजी या प्रमुख मार्गाची दुरवस्था झाली असून, तीन वर्षांपूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरण व नूतनीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शंभर कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाल्याचे आमदार सुरेश खाडे यांनी जाहीर केले होते. मात्र तीन वर्षे उलटल्यानंतरही काम सुरू झाले नाही. या कामाबाबत शहर सुधार समितीने आक्रमक पवित्रा घेत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिनी २७ मे रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश खाडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या शंभर कोटींचा प्रस्तावित रस्त्याची लांबी कमी करून नव्याने ५९ कोटी खर्चाचा प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. दोन महिन्यांत प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर काम सुरू होणार आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या मिरज शहराबाहेरून बायपास रस्त्याचे काम सुरू असल्याने मिरज शहरातून जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम रखडल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्याचे काम मंजूर होईपर्यंत गांधी चौक ते फुले चौकापर्यंत या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे आश्वासन देण्यात आले. पाठपुरावा करूनही रस्ते कामाबाबत निर्णय होत नसल्याने २७ मे पर्यंत निर्णय न झाल्यास महामार्गाचे काम रोखण्याचा व सुधार समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा खाडे यांनी दिला आहे.
कृष्णाघाट रस्त्यावर उड्डाणपूलच होणार असून, पुढील महिन्यात त्याची निविदा प्रसिध्द होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष रोकडे यांनी सांगितले. मिरज-मालगाव रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्याही सूचना खाडे यांनी बांधकाम विभागाला दिल्या.
बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता चंद्रकांत बरडे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता संजय देसाई, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, प्रा. मोहन व्हनखंडे, सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष जावेद पटेल, भाजप शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर उपस्थित होते.