सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील नोकरभरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, तांत्रिक पदांच्या ९ जागांसाठी रविवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ५ मार्च रोजी पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी ही भरती प्रक्रिया पार पडण्याची चिन्हे आहेत.राज्य शासनाने चार वर्षांपूर्वीच बॅँकेला नोकरभरती करण्यास परवानगी दिली होती. बॅँकेत रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. या सर्व कारणांनी तातडीने कर्मचारी भरती करण्यासाठी कर्मचारी संघटनाही आग्रही आहे. जिल्हा बॅँकेच्या संचालकांमध्येही यासाठी आग्रह वाढला होता. त्यामुळे नोकर भरतीबाबत आता प्रत्यक्ष पावले पडली आहेत. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार व्यवस्थापक (अकाऊंट), प्रथम श्रेणी अधिकारी (गुंतवणूक), द्वितीय श्रेणी अधिकारी (ए. एल. एम.), द्वितीय श्रेणी अधिकारी (करप्रणाली), तृतीय श्रेणी अधिकारी (गुंतवणूक), व्यवस्थापक (आय.टी.), प्रथम श्रेणी अधिकारी (आय.टी.), द्वितीय श्रेणी अधिकारी (आय.टी.), प्रथम श्रेणी अधिकारी (मार्केटिंग)अशा पदांचा समावेश आहे. यापूर्वीही या पदांच्या भरतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता थेट मुलाखतीद्वारे ही भरती होणार आहे. यापूर्वी निघालेल्या २५ तांत्रिक पदांच्या भरती प्रक्रियेतील १५ पदांसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. थेट मुलाखतीनंतर अन्य पंधरा जागांच्या नियुक्तीचा निर्णयही होण्याची शक्यता आहे.आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती बॅँकांमध्ये नोकरभरतीवेळी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने संबंधित प्रशासनावर कारवाई केली होती. काही ठिकाणी संचालक मंडळही बरखास्त केले होते. दक्षतेचा भाग म्हणून नंतर शासनाने जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील यापुढील भरती प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने तसेच त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. तांत्रिक पदांशिवाय अन्य पदांसाठी जी भरती करावी लागणार आहे, त्यासाठी आॅनलाईन पद्धतीचा अवलंब होण्याची शक्यता आहे.अन्य जागांच्या भरतीसाठी : हालचालीजिल्हा बँकेत चारशे जागांसाठी भरती होणार आहे. आॅनलाईन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असणार आहेत. शंभर ते दीडशे प्रश्न असून, ९० गुणांची परीक्षा होणार आहे, तर दहा गुण मुलाखतीसाठी आहेत. यातील पाच गुण शैक्षणिक पात्रतेसाठी आहेत. या पदभरतीसाठीही हालचाली सुरू आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी भरतीला मुहूर्त...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:28 PM