सांगली : राज्य शासनाने पुन्हा महापालिकेत एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरापूर्वीच सांगली महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने झाली; पण आता वर्षभरानंतर ही पद्धत जनतेसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. अनेक प्रभागात एकाच भागातील नगरसेवक निवडून गेल्याने दुसऱ्या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यातून नगरसेवकांबद्दल जनतेतही नाराजी वाढली आहे.
सांगली महापालिकेची निवडणूक दीड वर्षापूर्वी बहुसदस्यीय पद्धतीने झाली, पण आता त्याचे फायदे-तोटे समोर येऊ लागले आहेत. प्रशासकीय स्तरावरही अडचणी येत आहेत. बहुसदस्यीय पद्धतीमुळे प्रभागाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला. पूर्वी दोन सदस्य पद्धतीत ३९ प्रभाग होते. आता त्याचे वीस प्रभागात रूपांतर झाले. प्रभागांचा विस्तार भलामोठा झाल्याने प्रत्येक भागातील नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करणे नगरसेवकांनाही शक्य झालेले नाही. विशेषत: एकाच भागात तीन अथवा चार नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागात विकासाचे नियोजन अपयशी ठरत आहे. असे अनेक प्रभाग आहेत की एकाच परिसरातून तीन ते चार नगरसेवक निवडून आले आहेत, तर प्रभागाच्या दुसºया भगात एकही नगरसेवक नाही.
परिणामी दुस-या भागातील नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी नेमके कोणाकडे जायचे, हाच प्रश्न पडतो. त्यात विविध पक्षांचे नगरसेवक एकाच प्रभागातून निवडून आले असतील, तर विकासाची जबाबदारी एकमेकांवर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. नगरसेवकांत समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यांच्यात तेथे अनेक हेवेदावे आहेत. एकमेकांच्या परिसरात विकासकामे करण्यास अडवणूक केली जाते. त्यात नागरिकांनाही नेमके कोणत्या नगरसेवकाकडे जायचे, हेही कळत नाही. त्यामुळे एकूणच प्रभागाच्या विकासाला गती येत नाही. विकास कामांच्या मंजुरीपासून ते उद्घाटनापर्यंत अनेकदा मानापमान नाट्यही रंगते. त्यामुळे एकसदस्यीय पद्धती योग्य असल्याचे मत नगरसेवकांसह नागरिकांतूनही व्यक्त होत आहे. ज्या त्या प्रभागाचा नगरसेवक एकच असल्याने विकास कामांबाबत त्याला जबाबदार धरता येते. त्यामुळेच सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
नव्या पद्धतीत : घोडेबाजारचा धोकाएकसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये नगरसेवकांचा घोडेबाजार होण्याची शक्यता अधिक असते. या पद्धतीत अपक्ष नगरसेवकांची संख्या वाढते. त्यातून सत्ता हस्तगत करण्यासाठी अपक्ष नगरसेवकांशी अर्थपूर्ण तडजोडी होतात. त्यामुळे शहराच्या विकासाला गती येत नाही. बहुसदस्यीय पद्धतीमुळे अपक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत तर केवळ दोनच अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. यापूर्वी ही संख्या दहा ते पंधराच्या घरात असे.
बहुपद्धती प्रभागरचनेमुळे अनेक अडथळे येत आहेत. विकास कामे करतानाही नगरसेवकांत हेवेदावे होतात. सध्या जनतेलाही त्यांची कामे नेमक्या कोणत्या नगरसेवकाकडे घेऊन जायचे, असा प्रश्न पडतो. एकपद्धतीमध्ये थेट संबंधित नगरसेवकाला जबाबदार धरता येऊ शकते. त्यामुळे एकपद्धती प्रभाग रचना सोयीची आहे.- उत्तम साखळकर, विरोधी पक्षनेताजनतेशी संपर्क आणि विकास कामांचा पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवकांना बहुपद्धती अथवा एकपद्धती प्रभाग रचना, कोणतीही अडचण येत नाही. ते जनतेशी जोडलेले असतात. सर्वांनी समन्वय ठेवून काम करण्याची गरज आहे. बहुपद्धती प्रभाग रचनाच सध्या योग्य आहे. - संगीता खोत, महापौर