युनूस शेख -- इस्लामपूर--आघाडी आणि महायुतीची ताटातूट झाल्यानंतर एकास एक लढत देण्याच्या तयारीत असणाऱ्या विरोधकांचा ताळमेळ न जमल्याने येथे बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात १३ उमेदवार राहिले आहेत. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गुफ्तगूमुळे शिवसेनेच्या भीमराव मानेंना निवडणुकीतून अनपेक्षितपणे माघार घेण्याची नामुष्की आली, तर भाजपचे उमेदवार रिंगणात नाहीत.आज माघार घेण्याच्या अंतिम वेळेपर्यंत माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना एकास एक उमेदवार देऊन खिंडीत गाठण्याचे जोरदार प्रयत्न झाले; मात्र व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि विचारांची नाळ न जुळल्याने एकास एकची गाठ बांधण्याचा विडा उचललेल्या विरोधी नेत्यांनी स्वत:च कात्रजचा घाट पाहिल्याचे स्पष्ट झाले. अर्ज भरणाऱ्यांत भीमराव माने, वैभव पवार, विक्रम पाटील, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, अॅड. हंबीरराव पाटील यांचाही समावेश होता, मात्र निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, मनसेचे उदयसिंह पाटील, बसपचे महावीर कांबळे या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांशिवाय स्वाभिमानीचे बंडखोर अपक्ष बी. जी. पाटील, स्वाभिमानी पुरस्कृत अपक्ष अभिजित पाटील, आनंदराव थोरात, विश्वासराव घस्ते, अशोक वायदंडे, दत्तू गावडे, महादेव फसाले, सिनेअभिनेते विलास रकटे आणि वसंतराव हिंदुराव पाटील या उमेदवारांनी लढण्याची तयारी दाखवली आहे. जयंत पाटील यांच्याविरुध्द जितेंद्र पाटील व अभिजित पाटील, बी. जी. पाटील, विलास रकटे यांच्यामध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत.इस्लामपूर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्यासारख्या निवडणुकीच्या डावपेचात निष्णात असणाऱ्या उमेदवाराशी ‘एकास एक’ उमेदवार उभा करून टक्कर देण्यासाठी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी प्रयत्न केले, मात्र त्यांचे निर्णयक्षमता व राजकीय चातुर्य दुबळे असल्याचे समोर आले. इस्लामपूरची उमेदवारी ठरवताना त्यांनी लावलेला विलंबच कार्यकर्त्यांमध्ये शेट्टीच्या भूमिकेबाबत संशय निर्माण करणारा ठरला. शेट्टीच्या मनात येथून सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवण्याचा विचार होता; मात्र सदाभाऊ खोत यांचे राष्ट्रवादीचे नेते आणि वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी नकार दर्शवला असेल; मात्र त्याचवेळी सदाभाऊंनंतर दुसरा पर्याय शेट्टी यांनी ठेवला नसल्याने उमेदवारीचा हा घोळ शेवटपर्यंत कायम राहिला.इस्लामपूरएकूण मतदार २,५०,०७०नावपक्षजयंत पाटील राष्ट्रवादीजितेंद्र पाटीलकाँग्रेसअभिजित पाटीलअपक्षमहावीर कांबळेबसपाबी. जी. पाटीलअपक्षउदयसिंह पाटीलमनसेआनंदराव थोरातअपक्षविश्वासराव घस्तेअपक्षअशोक वायदंडेअपक्षदत्तू गावडेअपक्षमहादेव फसालेअपक्षविलासराव रकटेअपक्षवसंतराव पाटीलअपक्ष
बहुरंगी लढतीमुळे चुरस वाढली
By admin | Published: October 01, 2014 11:22 PM