सांगली : मुंबईतील ‘बेस्ट’च्या सेवेसाठी सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या एसटीच्या चालक, वाहकांना जूनपासून पाठविले जाणार नसल्याचे आश्वासन महाव्यवस्थापकांनी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला दिल्याची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बेस्टच्या सेवेसाठी सांगलीतील चालक, वाहक जाण्यास तयार नाहीत. तरीही प्रशासनाचा आदेश असल्यामुळे पन्नास चालक व वाहकांना पाठवावे लागत आहे. या प्रश्नावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे मंगळवारी आंदोलन होणार होते. त्यापूर्वीच महाव्यवस्थापकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मुंबईच्या ड्युटीसाठी दोन आठवडे पाठविण्यात यावे, जूनपासून मुंबईची ड्युटी बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन रद्द केल्याची माहिती अशोक खोत यांनी दिली.
चौकट
मृत कर्मचारी मदतीपासून वंचित
सांगली विभागातील मुंबईला सेवेसाठी गेलेल्या १३ चालक, वाहकांचा मृत्यू झाला आहे. या चालकांना ५० लाखाचे विमा कवच असतानाही त्याचा लाभ मिळालेला नाही, तो तत्काळ मिळाला पाहिजे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्काळ नोकरीत सामावून घ्यावे, कोरोना रुग्णांना दीड लाखाची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी खोत यांनी केली.