सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी पथदिवे प्रकल्पासाठी मुंबई व पुणे येथील दोन कंपन्यांनी निविदा दाखल केली आहे. उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील कमिटीकडून या दोन्ही कंपन्यांच्या तांत्रिक कागदपत्रांची तपासणी होणार आहे. त्यानंतर पात्र निविदाधारकांच्या दराचा लिफाफा उघडला जाईल, असे प्रशासनाने सांगितले.
महापालिका क्षेत्रात ३२ हजार पथदिवे आहेत. राज्य शासनाने ईईएसएल या खासगी कंपनीला एलईडी पथदिवे बसवण्याचा ठेका दिला होता. मात्र, कंपनीच्या अटी व शर्तींमुळे महापालिकेला पंधरा ते वीस कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार होता. त्यामुळे ईईएसएल कंपनीपेक्षा कमी दराने एलईडी दिवे बसवून देणाऱ्याला ठेका देण्याचा ठराव महासभेने केला. त्याला नगर विकास विभागानेही मान्यता दिली. त्यानंतर महापालिकेने एलईडी पथदिवे प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध केली. निविदा भरण्यासाठी तीनदा मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीत दोनच निविदा दाखल झाल्या. त्यामुळे आयुक्तांनी प्रकल्पाच्या निविदा तांत्रिक कागदपत्रांचे लिफाफे उघडण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार बुधवारी निविदा उघडण्यात आल्या. या प्रकल्पासाठी पुणे येथील समुद्रा इलेक्ट्राॅनिक सिस्टिम प्रा. लि. आणि मुंबईची ई स्मार्ट सोल्युशन प्रा. लि. या दोन कंपन्यांनी निविदा भरली आहे. पहिल्या टप्प्यात या दोन्ही कंपन्यांची तांत्रिक पात्रता निश्चित केली जाणार आहे.
चौकट
समितीकडून छाननी
एलईडी प्रकल्पाच्या निविदेसाठी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत शहर अभियंता, विद्युत अभियंता, सहायक आयुक्त, मुख्य लेखापरीक्षक व मुख्य लेखाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीसमोर दोन्ही कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी होणार आहे. या छाननीनंतर पात्र निविदाधारकांचा अहवाल आयुक्तांकडे सादर होईल. आयुक्तांच्या मान्यतेनंतर दराचा लिफाफा उघडला जाणार आहे.