शिराळा : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई येथील निर्मलनगर, बांद्रा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय रामचंद्र काळे (मूळ गाव सरूड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सरूड गावातील पंचवीस वर्षीय युवती कोकरूड येथे कॉलेजमध्ये शिकत आहे. या युवतीची २० जून २०१६ रोजी उदय काळे याच्याशी ओळख झाली. यातून उदय याने ‘तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर, मी तुला नोटस् देईन,’ असे सांगून जवळीक केली. २९ आॅगस्ट २०१६ रोजी फोनवरून उदयने ‘मी तुझ्याशीच लग्न करणार आहे’, असे सांगितले. त्याचबरोबर सर्व मित्र-मैत्रिणींनाही आपण दोघे लग्न करणार आहे, असे तो सांगत होता.यानंतर १५ नोव्हेंबर २०१६ रोजी या युवतीचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी उदय काळे व युवती मोटारसायकल (एमएच ०९-९५०१)वरून शिराळा येथील एका लॉजवर आले. त्याठिकाणी वाढदिवस साजरा केला व उदय काळे याने आता आपण लग्न करणारच आहोत, असे सांगून या युवतीचा विरोध डावलून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. सप्टेंबर २०१७ पासून उदय काळे याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असे सांगून या युवतीचे फोन घेणे व बोलणे बंद केले.याबाबत या युवतीने शाहूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती; मात्र अत्याचाराच्या घटना शिराळा येथील लॉजवर घडल्याने शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे करीत आहेत.
मुंबईच्या उपनिरीक्षकावर शिराळ्यात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:05 AM